डिजिटल डिव्हाइसच्या वापराने नात्यातील प्रेम वाढतं की कटूता?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 01:08 PM2018-06-22T13:08:26+5:302018-06-22T15:00:10+5:30
अनेकदा मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या अधिक वापराने नात्यात प्रेमाऐवजी कटूता अधिक वाढते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून हा खुलासा झाला आहे.
(Image Credit: Dreamstime.com)
तसे तर दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना जवळ आणण्यासाठी डिजिटल डिव्हाइस महत्वाची भूमिका बजावतात. पण अनेकदा मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या अधिक वापराने नात्यात प्रेमाऐवजी कटूता अधिक वाढते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून हा खुलासा झाला आहे.
'Kaspersky Lab' यांच्याकडून करण्यात आलेल्या एका सर्व्हे रिपोर्टनुसार, 50 टक्क्यांपेक्षा अधिक कपलमध्ये भांडण होण्याचं मुख्य कारण पार्टनरचा जेवताना किंवा बोलताना मोबाईलचा वापर हे आहे. त्यासोबतच लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 60 टक्के लोकांच्या भांडणाचही हेच कारण आहे. तर जे कपल वेगळे राहतात त्यातील केवळ 49 टक्के लोकांमधील नात्यात कटूता आढळली आहे.
या सर्व्हेमध्ये जगभरातील 18 देशांच्या जवळपास 1800 लोकांना सहभागी करण्यात आले होते. हे सगळी लोकं 6 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून नात्यात आहेत अशांचा यात समावेश करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, आपल्या पार्टनरने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं लोकांना अजिबात आवडत नाही. सर्वांनाच हे वाटतं की पार्टनरचं लक्ष त्यांच्याकडे असावं.
Kaspersky Lab चे व्हाईस प्रेसिडेन्ट Dmitry Aleshin म्हणाले की, जेव्हा दोन लोक एकमेकांपासून वेगळे राहतात, तेव्हा डिजिटल डिव्हाइस त्यांना जवळ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. पण त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त वापराने नात्यात कटूता येण्यासारख्या आणखीही काही गंभीर समस्या होऊ शकतात.