Friendship Day 2018: मैत्रीतलं प्रेम अन् प्रेमातली मैत्री

By वैभव देसाई | Published: August 5, 2018 07:05 AM2018-08-05T07:05:28+5:302018-08-05T07:06:41+5:30

मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झाले हे वृषाली आणि मनोजलाही समजलेच नाही.

Friendship Day 2018: Friendly love and love friendship | Friendship Day 2018: मैत्रीतलं प्रेम अन् प्रेमातली मैत्री

Friendship Day 2018: मैत्रीतलं प्रेम अन् प्रेमातली मैत्री

Next

मनोजला तशी गावची फार आवड होती. विद्यार्थी दशेपासूनच त्याला मे महिन्याच्या सुट्टीतून बाबा आवर्जून गावी घेऊन जात असे. गावातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळणे, नदीत पोहायला जाणे या त्याच्या आवडत्या गोष्टी होत्या. गणपतीतूनही गावी जाणं होत असल्यानं निसर्गाशी त्याची चांगली गट्टी जमली होती. झाडांच्या हिरव्या गर्द झाडीतून वाट काढत नदी गाठण्याचा अनुभव मनोजसाठी अद्वितीय असे. कालांतरानं शिक्षणाच्या एक एक पाय-या चढत मनोज दहावीत पोहोचला. दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याला गावी जाण्याची फार इच्छा होती. परीक्षा संपल्यानंतरचा दोन महिन्यांचा कालावधी मुंबईतल्या घरी बसून कसा काढायचा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. तसेच वडिलांना त्याच वेळी सुट्टी नसल्यानं त्याचा काहीसा हिरमोड झाला.

तसं मनोजचं अधूनमधून मामाच्या गावीही जाणं व्हायचं. त्यावेळी मामानं नेमकं मनोजच्या आईला फोन करून मनोजला गावी पाठवण्याचा आग्रह केला. मामाचा आग्रह आई तरी कसा मोडू शकणार होती. आईनं मनोजला मामाच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. झालं मग ठरलं मनोजला मामाच्या गावी पाठवायचं. मनोजही फार खूश होता. मामाच्या गावीसुद्धा मोठाली नदी, डोंगर रांगांसह मामाची एकरांमध्ये शेती होती. आंबा आणि काजूच्या बागा होत्या. त्यामुळे मनोजनंही गावातल्या मुलांबरोबर बागांमध्ये जाऊन आंबे खाणे, नदीवर जाऊन मनसोक्त डुंबण्यासह डोंगर रांगामध्ये फिरण्याचे मनोमन प्लॅन बनवण्यास सुरुवात केली. अखेर मनोज गावी जाण्यासाठी गाडीत बसला आणि सकाळी तो मामाच्या गावात दाखल झाला. उतरल्या उतरल्या निसर्गाच्या त्या शुद्ध हवेनं मनोजची झोप कुठल्या कुठे पळाली. सामानाची बॅग घेऊन मनोजनं थेट मामाचं घर गाठलं. घरी पोहोचल्यानंतर मामीनं आंघोळ करून येण्यास सांगितले आणि त्याच्या पुढ्यात गरमागरम पिठलं भाकरी ठेवली. मनोजनं क्षणाचाही विलंब न करता त्यावर ताव मारला. त्यानंतर मनोजचं गावातल्या मुलांबरोबर हिंडणं सुरूच होतं.

ब-याचदा मनोज वाडीतल्याच गणेश नावाच्या मित्रासोबत माधवाची वाडी(वरची वाडी)वर जात असे. खेडशी गावात तशा चार वाड्या होत्या. सर्वच वाड्यांमध्ये जवळपास ३ ते ४ किलोमीटरचं अंतर होते. खालच्या वाडीतून माधवाच्या वाडीत जायचं म्हटल्यास बरीच पायपीट करावी लागे. माधवाच्या वाडीत जाण्याचा हेतू म्हणजे तिथे पाटलाचं किराण्याचं दुकान होतं. त्या दुकानावर पॅप्सीपासून बरेच खाद्य पदार्थ मिळत होते. खरं तर मनोजसाठी माधवाच्या वाडीत जाण्याचा अनुभव हा जरा नवाच होता. परंतु गणेशचं माधवाच्या वाडीत कायम येणं-जाणं असायचं. कारण गणेशचा मामासुद्धा माधवाच्या वाडीत राहत होता. गणेशच्या आईचं त्याच्या वडिलांशी प्रेमसंबंधातून लग्न झालं होतं. त्यामुळे गणेशला माधवाच्या वाडीची वाट काही नवी नव्हती. एकदा गणेश आणि मनोज दोघेही वरच्या वाडीत गेले होते. त्यावेळी गणेशनं चल जरा मामाकडे जाऊन येऊ या, असा मनोजला आग्रह केला. परंतु मनोज त्यासाठी तयार नव्हता. अखेर गणेश त्याला जबरदस्तीनं तिकडे घेऊन गेला. मनोज तिकडे गेल्यानंतर त्याला खळ्यातच एक सुंदर मुलगी दिसली. मनोजला पाहून ती घरात गेली.

गणेश आणि मनोज दोघेही घरात गेल्यानंतर गणेशच्या मामीनं दोघांसाठी चुलीवर चहा टाकला आणि वृषालीला दोघांना पाणी देण्यास सांगितलं. ग्लासातून पाणी घेऊन आलेली मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून ती मगाशी खळ्यात उभी असलेली सुंदर मुलगी होती. अर्थात तिचं नाव वृषाली आहे हे मनोजला आता समजलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. गणेश मामीशी गप्पा गोष्टी करण्यात दंग झाला. मनोज आपला अवघडल्यासारखा एका ठिकाणी बसून राहिला. वृषालीही लांबून सगळं पाहत होती. त्यानंतर गणेशनं मनोजची मामा-मामीशी ओळख करून दिली. तसा मनोजचा मामा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्यामुळे त्याला सगळेच ओळखत होते. मग गणेश आणि मनोज माधवाच्या वाडीत गेल्यानंतर वरचेवर गणेशच्या मामाकडे ये-जा करत होते. गणेशच्या मामाला तशी एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगी म्हणजे वृषालीच.

मनोज आणि गणेशचं माधवाची वाडीवर जाणं-येणं होत असल्यानं वृषालीची आणि मनोजचीही चांगली मैत्री झाली. वय अल्लड असल्यानं मनोजही वृषालीची चेष्टा-मस्करी करत असे. वृषालीलाही मनोजनं केलेली मस्करी फार आवडे. मनोजनं नुकतीच १०वीची परीक्षा दिल्यामुळे त्या वयात प्रेम हे काय असतं हे त्याला ठाऊकच नव्हतं. परंतु जेव्हा मनोज मुंबईला आला तेव्हा त्याला वृषालीची आठवण सतावू लागली. वृषालीच्या मनातही तशाच काहीशा भावना होत्या. त्यामुळे वृषालीही गावातल्या एसटीडी बुथवरून कधी ना कधी मनोजला फोन करत असे. कॉलेजात मुलं-मुली कसं प्रेम करतात ते मनोजनं त्यावेळी जवळून पाहिलं. तेव्हा त्यालाही वृषालीशी असलेली मैत्री म्हणजेच प्रेम याची जाणीव झाली. मग एकदा वृषालीनं गावातल्या एसटीडी बुथवरून फोन केला असता, मनोजनं तिला प्रपोज केलं. वृषाली जणू काही या क्षणाची वाटच पाहत होती. परंतु तिने मनोजला त्यावेळी काहीच उत्तर न देता फोन ठेवला. पुन्हा आठवड्यानं तिने मनोजला फोन केला. त्यावेळी पुन्हा मनोजनं तिला विचारला केली. तेव्हा तिनं फोनवरून लाजत हो म्हटलं. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झाले हे वृषाली आणि मनोजलाही समजलेच नाही. असं म्हणतात, खरं प्रेम त्यागात दडलेलं असतं. काही अपरिहार्य कारणास्तव कालांतरानं त्यांचं हे नातं संपुष्टात आलं. परंतु त्याच्यातील मैत्री कधीच संपली नाही.
(ही कथा काल्पनिक असून, त्याचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)

Web Title: Friendship Day 2018: Friendly love and love friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.