Friendship Day 2018: फ्रेण्डशिपचा खेळ (झाला) सारा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 03:06 AM2018-08-05T03:06:42+5:302018-08-05T03:07:10+5:30

आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेण्डशिप डे साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांबाहेर गेले दोन दिवस फ्रेण्डशिप बॅण्ड, गिफ्ट, विविध रंगांची स्केचपेन यांची दुकाने सजली आहेत.

Friendship Day 2018: Friendship game (done) Sarah ... | Friendship Day 2018: फ्रेण्डशिपचा खेळ (झाला) सारा...

Friendship Day 2018: फ्रेण्डशिपचा खेळ (झाला) सारा...

- संतोष सोनावणे
आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेण्डशिप डे साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांबाहेर गेले दोन दिवस फ्रेण्डशिप बॅण्ड, गिफ्ट, विविध रंगांची स्केचपेन यांची दुकाने सजली आहेत. एकमेकांना बॅण्ड बांधणे किंवा हातावर एकमेकांची नावे लिहिणे म्हणजे फ्रेण्डशिप अर्थात मैत्री आहे का? दररोज एकमेकांच्या बरोबर तासन्तास असलेल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना आपल्या मित्र अथवा मैत्रिणीच्या मनातील खळबळ कळत नसेल आणि त्याच्या किंवा तिच्या अचानक आत्महत्येनंतर किंवा घरातून पळून जाण्यामुळे धक्का बसणार असेल, तर त्याला मैत्री कसे म्हणायचे?
गे ल्या रविवारी माझा जिवलग मित्र अलंकार याच्यासोबत आमच्या जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आमच्या चांगल्या कामाबद्दल आम्हास गौरवले, खरेतर प्रामाणिकपणे व निष्ठेने आपण काम करत राहिले तर असे क्षण सगळ्यांच्याच वाट्याला येतात. मला मात्र यात आम्हा दोघा मित्रांना हा क्षण एकत्र अनुभवता आला, याचे जास्त समाधान होते. आमच्या मैत्रीत आम्ही असे क्षण खूप अनुभवले, मात्र यामुळे मैत्रीचा बंध हा अधिक घट्ट होऊन पुढच्या कार्याची आम्हाला सतत प्रेरणा मिळत असते. कारण केवळ आणि केवळ नि:स्वार्थ भावनेने आम्ही जपलेली आमची मैत्री.
खरंतर आपण सारेच जण आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींमध्ये वावरत असतो. ती मैत्री जपावी, दृढ व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र या आजच्या वेगाने धावणाऱ्या जगात मैत्रीचे किती क्षण आपण जपतो, यावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्याशी कोणतेही रक्ताचे नाते नसणारी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपले भावविश्व व्यापून जाते. त्यामुळे नात्यातल्या व्यक्तींपेक्षा कधीकधी ती व्यक्ती फारच जवळची वाटते आणि सतत आपणास आधार देणारी असते. जगात मैत्रीसारखे सुंदर नाते नाही. ज्याच्या आयुष्यात असे क्षण येतात तो जगातला खरंच सुखी व्यक्ती म्हणावे लागेल.
मैत्री... या शब्दाबद्दल काय बोलावं किंवा किती बोलावं? असे म्हटले तर ते अपुरेच ठरेल. ज्यात पावित्र्य आहे... नि:स्वार्थीपणा आहे... काळजी आहे... त्याग आहे... विश्वास आहे.... म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर सर्व काही. जरा आपण आपल्या आयुष्यात मित्रांसोबत घालवलेले ते दिवस आठवा म्हणजे आपल्याला जाणीव होईल की खरंच आपण एकमेकांसाठी किती महत्त्वाचे होतो. यातूनच मग एकमेकांसाठी असणे ही प्रेरणा मिळते. आपल्या सुख-दु:खाच्या वेळी आपल्याला त्याची आठवण होणे त्याने मग धावून येणे आणि माझे दु:ख त्याचे समजून झोकून देणे तर सुखाच्यावेळी आपल्याआधी त्याचे तिथे पोहोचणे हे सारेसारे कसे आपल्याला हवेहवेसे वाटणे स्वाभाविकच होऊन जाते. त्यामुळेच तर मैत्री हे नाते रक्ताचे नसले, तरीही त्या नात्याला त्यापेक्षाही अधिकचे महत्त्व आहे. कारण मैत्रीत असणारा आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अडचणीच्या वेळी सहकार्य करणारी भावना खूप काही सांगून जाते. या अशा निर्मळ आणि शुद्ध विचारावर आधारलेली मैत्री ही कोणाबरोबरही होऊ शकते. अगदी समवयस्कांपासून ते आबालवृद्धांपर्यंत. त्याचे काही नियम नाहीत किंवा निर्बंध नाहीत. या मैत्रीला कोणत्याही भेदभावाचा डाग नाही. त्यामुळेच या नात्याचे महत्त्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे. शाळेतल्या मैत्रीची मजा वेगळीच तर महाविद्यालयातील मैत्रीची नशा वेगळीच असते. वयपरत्वे त्याचा रंग चढत जातो. सोसायटीतील मित्र, प्रवासातील मित्र, कार्यालयातील मित्र, असे किती तरी प्रकारचे मित्र आपण अनुभवत असतो. खरेतर सामाजिक बांधीलकी जपण्याचे खरे काम मैत्रीत दडलेले असते. मात्र दुर्दैवाने आज मैत्रीत गरज आणि स्वार्थ या दुर्गुणांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे नैराश्य, अपयश, त्रागा, एकटेपणा अशा भावनांनी आपले डोके वर काढले आहे.
दहावी-बारावीच्या निकालानंतर आत्महत्या करणाºया मुलांची संख्या कमी होत नाही तर बालगुन्हेगारीचे आकडेही वाढताना दिसून येतात. रिमांड होममध्ये क्षमतेपेक्षा अधिक मुले- मुली दाखल आहेत. कुटुंबातील संस्कार तर अपुरे पडतच आहेत मात्र ज्या वयात मुले-मुली समवयस्कांच्या सोबत वावरतात, हिंडतात, फिरतात. त्यावेळेस भले-बुरे, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य याची जाण व्हायला हवी. यावर त्या मैत्रीत संवाद व्हायला हवा. केवळ हाताला फ्रेण्डशिप बॅण्ड बांधून, पेनाने नाव लिहून किंवा आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिनाचा उत्सव साजरा करून हे होणार नाही. कारण मैत्री केवळ फ्रेण्डशिप बॅण्ड बांधून व्यक्त करण्याची बाब नाही, ती अंत:करणातून जोडली जाते. मैत्री ही एक दिवसाची साजरी करण्याची गोष्ट नाही तर ते बंध असतात अनंत काळाचे. ते बंध अंत:करणातून जोडले जातात. ती जाणून घेण्यासाठी अंत:करणाचाच मार्ग अनुसरावा लागतो. मैत्री ही निरंतर वाहणाºया गंगेसारखी निर्मळ व पवित्र असते. त्याग-नि:स्वार्थ-काळजी-विश्वास या खांबावर उभी राहणारी मैत्री आज मला मित्र काय आणि किती महागडे गिफ्ट देणार, अशा स्वार्थात ती बरबटून गेली आहे. बाजारपेठा फ्रेण्डशिप डे साजरा करणाºया वस्तूंनी भरून गेला आहे.
खरेतर मैत्रीचे आदर्शचं आज लोप पावत चालले आहेत. शाळाशाळांमधून पालकांच्या अपेक्षांनी मुले मित्र होण्याऐवजी एकमेकांचे स्पर्धकच अधिक झालेत. तेच चित्र महाविद्यालयात दिसून येते. तेथील चित्र तर खूप भयानक आहे. कोण माझी मैत्रीण असेल आणि कोणाची नसेल, यावरून मुलांचे होणारे राडे काही नवीन नाहीत. एकदा डोळे उघडून महाविद्यालयाच्या बाहेर आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या शनिवारचे चित्र किती भयावह असते यावरून ते आपल्याला लक्षात येईल. समाजात फसवाफसवी, गुंडगिरी यात तरूण अडकला जातोय. नोकरीच्या ठिकाणी भ्रष्टाचार तर राजकारणात स्वार्थाकरिता मारल्या जाणाºया बेडूक उड्या या सगळ्यांकडे डोळे उघडून पाहिले तर मैत्रीचे ते चार खांब खूप दूर राहतात. मग सुरू असतात ते असे फ्रेण्डशिप डे चे चंगळवादी ओंगळ रूप... असो शेवटी काय... यारा... यारा... फ्रेण्डशिपचा खेळ. ( झाला) सारा!

Web Title: Friendship Day 2018: Friendship game (done) Sarah ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.