मुलांचं ‘क्रेडिट’ मुलांनाच देता, की त्यावर ‘हक्क’ सांगता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:23 PM2017-09-25T13:23:21+5:302017-09-25T13:25:38+5:30
मुलांचा आत्मविश्वास नाहीतर वाढेल कसा?
- मयूर पठाडे
मुलं कधीच कोणतीच जबाबदारी घेत नाहीत, अशी अनेक पालकांची नेहेमीची तक्रार असते. त्यासाठी ते मुलांना कायम दुषणंही देत असतात. ‘इतक्या वेळा तुला सांगावं लागतं, पण आजपर्यंत तू ऐकलं असेल तर शपथ..’ असे बोल कायम ते त्याला ऐकवतही असतात. अर्थातच ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही. मूल एकही जबाबदारी घेत नाही, असं नसतं. बºयाचदा जबाबदारी टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो, हे खरं असलं तरी जेव्हा जेव्हा आपली मुलं जबाबदारी घेतात, घेऊ पाहातात, तेव्हा त्यांना आपण किती उत्तेजन देतो, त्यांच्या त्या कृतीचं कितीवेळा कौतुक करतो हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारायला हवा.
मुलं जबाबदार व्हावीत यासाठी काय कराल?
मुळात जबाबदारी ही एका रात्रीतून येत नाही आणि जादूची छडी फिरवल्यासारखं अचानक कोणी जबाबदार बनतही नाही. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.
अर्थातच मुलाचं वय काय आहे, त्यानुसारच आणि त्याला झेपणारी अशीच जबाबदारी त्याच्यावर टाकायला हवी. त्यात तो चुकला तरी त्याच्यावर न ओरडता त्याच्या पाठीशीच उभं राहायला हवं.
लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलं जसजशी मोठी होत जातील, तसतशी त्यांच्या खूपच उपयोगी पडेल आणि त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढेल.
एकदा का जबाबदारी घेण्याची सवय लागली की मग त्याचं उत्तरदायीत्वही त्यांना दिलं पाहिजे. एखादी जबाबदारी त्यांनी योग्य रीतीनं पार पाडली, तर त्याचं सारं क्रेडिट मुलांनाच जायला हवं. त्याचं क्रेडिट जर पालकांनी घ्यायचा प्रयत्न केला, ‘बघ, मी सांगितलं, त्याचा फायदा झाला की नाही, असंच माझं ऐकत जा..’ असं कधी आडून, कधी प्रत्यक्ष जर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न पालकांनी केला, तर त्याचा उलटच परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.
जबाबदारी घेतल्यानंतर त्याचा परिणाम जर चुकीचा झाला, तर मुलांना आणखी संधी दिली पाहिजे. ‘तुला काहीच कळत नाही, सांगितलं होतं ना, नको करूस म्हणून..’ असं केलं तर जबाबदारी घेण्यापासून मुलं लांबच राहतील आणि मोठेपणीही कोणताही निर्णय घेण्यापासून ते घाबरतील.
जबाबदारी घेण्याचं योग्य ते स्पष्टीकरण देतानाच त्यांना सारखे उपदेशाचे डोस न पाजता, योग्यतेचं भान आपणही पाळलं तरी मुलं नक्कीच एकामागे एक जबाबदाºया स्वीकारतात. चुकांतून शिकतात आणि झटपट पुढे जातात. नैराश्यापासून कायम लांब राहातात..