पार्टनरसोबतची भांडणं टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 01:20 PM2018-04-30T13:20:37+5:302018-04-30T13:20:37+5:30
अनेकदा गैरसमजातून होणारी भांडणं टोकाला जातात आणि त्यातून नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं.
मुंबई : अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोलत असताना ते बोलणं भांडणात बदलतं. या भांडणाला अनेक कारणे असतात. प्रेमाच्या नात्यात भांडणं ही होतातच. पण अनेकदा गैरसमजातून होणारी भांडणं टोकाला जातात आणि त्यातून नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. त्यामुळे विनाकारणची भांडणं होऊ न देणं हे आवश्यक असतं. त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी खालील काही गोष्टींची काळजी घेता येईल.
1) बोलण्यासाठी योग्य वेळ
दिवसा किंवा रात्री बोलण्यासाठी अशी वेळ निवडा ज्यावेळी तुमच्या डोक्यात दुसरं काहीही नसणार. कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये अशी वेळ निवडा.
2) एकमेकांचं ऐकून घ्या
समोरच्याने आपलंच बोलणं ऐकावं अशी अनेकांची भावना असते. समोरच्याचं ऐकून घ्यावं असा विचार केला जात नाही. हे फारच महागात पडू शकतं. समोरच्या व्यक्तीचा इगो दुखावला जाऊ शकतो. आपलं म्हणनं मांडा त्यासोबतच समोरच्या व्यक्तीचंही ऐकून घ्या.
(पहिली डेट शेवटची ठरु नये यासाठी खास डेटिंग टिप्स)
3) मध्येच उठून जाऊ नका
अनेकदा काही लोक हे रागाच्या भरात बोलणं अर्धवट सोडून निघून जातात. असे केल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. ज्या कारणामुळे भांडण होतंय, त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे बोलणं मध्येच सोडून जाऊ नका.
4) बोलणं समजून घ्या
दोन प्रेमाच्या व्यक्तीतील भांडणात जय-पराजय असा काही मुद्दा नसतो. पण या भांडणात तुम्ही विजय मिळवण्याची भावना ठेवत असाल, तर त्याने समस्या सुटणार नाही तर आणखी वाढेल. त्यामुळे समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे समजून घ्या आणि मग त्यावर बोला.
(ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप)
5) शब्दांचे खेळ खेळू नका
तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही फिरवून, मोठ मोठ्या शब्दांचा वापर करुन बोलत असाल तर हे थांबवा. दुसरीकडे अशीही अपेक्षा करु नका की, तुम्ही काही बोलण्याआधीच समोरच्या व्यक्तीने तुमच्या मनातील ओळखावं.