Friendship Day 2019 : जाणून घ्या, कधी अन् कशी झाली फ्रेंडशीप डेची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 03:47 PM2019-08-03T15:47:06+5:302019-08-03T16:16:51+5:30
मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते.
(Image Credit : Caitlin Creel)
मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येकच दिवस खास असतो. पण तरीही जगभरात ऑगस्ट महिन्यात फ्रेन्डशिप डे धडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी मित्र एकत्र येऊन धमाल करतात. तर काही लोक नवीन मैत्रिच्या नव्या नात्याला सुरुवात करतात. पण फ्रेन्डशिप डे ची नेमकी सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? बहुदा अनेकांना हे माहीत नसतं. त्यामुळे चला जाणून घेऊ फ्रेन्डशिप डे ची सुरुवात कशी झाली.
फ्रेन्डशिप डे चा इतिहास
'फ्रेन्डशिप डे' साजरा करण्याचा ट्रेन्ड हा तसा इतर डेज प्रमाणे पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. पण भारतात गेल्या काही वर्षांपासून हा डे तरुणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. ग्रिटींग कार्ड, सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात आणि आयुष्यभर मैत्री निभवण्याचं वचन घेतात. पण या दिवसाच्या सुरुवातीची कहाणी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात दडली आहे.
असे म्हटले जाते की, पहिल्या महायुद्धानंतर लोकांमध्ये आणि देशांमध्ये आपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाच्या भावना निर्माण झाली. हे संपवण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकेच्या सरकारने फ्रेन्डशिप डे ची सुरुवात केली होती. त्यावेळी हे ठरवण्यात आले की, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा साजरा केला जाणार. त्यामागचं कारण हे आहे की, रविवारी सुट्टी असते आणि लोक एकत्र येऊन हा दिवस साजरा करु शकतात.
अशीही मान्यता
असेही म्हटले जाते की, १९३५ मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता. त्या निर्दोष व्यक्तीचा जीन घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला.
वेगळ्या देशात वेगळ्या तारखेला साजरा होतो हा डे
जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रेन्डशिप डे वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो. तर काही जागांवर हा डे पहिल्या रविवारी नाही तर २ तारखेला हा डे साजरा करतात. ओहायोच्या ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो.
१९९७ मध्ये अमेरिकेतील सरकारने प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर 'विनी द पू' याला फ्रेन्डशिप डे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर केलं होतं. २७ एप्रिल २०११ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत ३० जुलैला अधिकृतपणे 'इंटरनॅशनल फ्रेन्डशिप डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.