कसा पार्टनर असल्यावर वाढतं तुमचं आयुष्य आणि मेंदुची क्षमता, वाचा काय सांगतो रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 04:07 PM2023-09-05T16:07:05+5:302023-09-05T16:54:27+5:30
एका रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, कसा पार्टनर असल्यावर तुमचं आयुष्य वाढतं आणि तुमच्या मेंदुची क्षमताही वाढते.
रिलेशनशिपबाबत सतत काहीना काही रिसर्च समोर येत असतात. ज्यात नात्यांबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. कपलचं जीवन कसं सुखकर होऊ शकतं, त्यांच्यातील वाद कसे मिटवले जाऊ शकतात, एका सुखी आयुष्याचा फंडा असे अनेक सल्ले या रिसर्चमधून दिले जात असतात. अशाच एका रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, कसा पार्टनर असल्यावर तुमचं आयुष्य वाढतं आणि तुमच्या मेंदुची क्षमताही वाढते.
रिसर्चनुसार एका आशावादी व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशनशिप असले तर तुमच्या आयुष्याची आणि मेंदूची क्षमता वाढू शकते. कारण आशावादी लोकांचं वागणं हे नेहमी हेल्दी असतं.
मिशिगन युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांच्या एका ग्रुपनुसार, जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमचा मेंदू अधिक वेगवान असल्याचं रहस्य यात लपलेलं असतं की, तुमचा जोडीदार किती आशावादी आहे. तुमची समजण्याची क्षमता कोणत्या कारणांमुळे कमी होते किंवा वाढते हे खालील काही गोष्टींवरून बघता येईल.
मिशिगन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि रिसर्चचे मुख्य लेखक विलियम जे चॉपिक यांनी सांगितले की, समजण्याची क्षमता कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यात आनुवांशिक समस्या, बायोलॉजिकल मार्कर आणि जीवनशैलीची कारणे असतात.
जीवनशैलीसंबंधी कारणांमध्ये शारीरिक हालचाली, पौष्टीक आहार, वजन आणि अधिक सक्रिय असणं यांचा समावेश आहे. एक रूटीन लाइफ जगणं याचाही यात समावेश करता येऊ शकतो.
चॉपिक म्हणाले की, जे लोक आशावादी असतात ते आरोग्यदायी व्यवहार जसे की, चांगला आहार, अधिक सक्रिया राहणे आणि प्रिव्हेंटिव हेल्थकेअरशी संबंधित असतात.
कदाचित हेच कारण आहे की, आशावादी असणं ही समजण्याची क्षमता वाढण्यासाठी सर्वात चांगली बाब आहे. तसेच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, आशावादी व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये असल्याने पार्टनरला वेगवेगळे फायदे होतात.