'तो आणि मी' - आज खूप दिवसांनी मी त्याच्या प्रेमात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 04:40 PM2018-09-14T16:40:04+5:302018-09-14T16:43:17+5:30
आज खूप दिवसांनी त्याच्या प्रेमात मी न्हाऊन निघाले होते गॅलरीत मस्त गार वारा व तो आणि मी दोघेच होतो. त्याचा स्पर्श मला मोरपीस फिरवल्यासारखा वाटत होता
आज खूप दिवसांनी त्याच्या प्रेमात मी न्हाऊन निघाले होते गॅलरीत मस्त गार वारा व तो आणि मी दोघेच होतो. त्याचा स्पर्श मला मोरपीस फिरवल्यासारखा वाटत होता, का कुणास ठाऊक तो मला आज गतकाळात घेऊन जात होता.. त्याचे आणि माझे तसे युगायुगांचे नाते जणू कांही साताजन्माची सोबत त्याच्यावर मी लहानपणापासून प्रेम करत आले आहे लहानपणी त्याचे गुण मला समजत नसायचे पण मी जसजशी मोठी होत गेले व समज येऊ लागली तसतसा तो मला समजू लागला..व त्याचे गुण व अवगुण मी समजून चुकले
लहानपणी त्यानेच मला बऱ्याच वेळा आनंद लुटायची संधी दिली होती तर बऱ्याच वेळा ओरडा हि बसवून दिला होता.तेंव्हाही त्याच्याकडे पाहत बसायला मला खूप आवडायचे व आज ही तो मला तेवढाच आवडतो. त्याच्याकडे पाहण्याच्या नादात मी खूप वेळा आईचे धपाटे हि खाल्ले आहेत अभ्यासाला बसले असताना तो आला की मी खिडकीतून त्याला बघत रहायचे व तो हि मला नादी लावायचा तोंडात पेन चघळत त्याच्याकडे पाहत मी कुठे हरवून जायचे हे मला कळतच नव्हते...
मी तारुण्यात पदार्पण केले व त्याने मला त्याच्या प्रेमात चिंब चिंब केले..त्यानेच तर मला कविता करायला शिकवले मला अजूनही आठवते माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या वेळी तोच माझ्या सोबत होता अगदी डी. एड चा फॉर्म भरताना त्याने मला भिजवलेले व मी खूप चिडलेले माझ्या चांगले लक्षात आहे.खूप खट्याळ पणे वागायचा...
मला नोकरी लागली मी एकटीच असायचे त्यावेळी खूप अस्वस्थ वाटले की यायचा सोबत तो व मी मस्त गप्पा मारायचो. तोच तर माझा सखा होता..माझ्या लग्नाच्या वेळी हि तो उपस्थित होता त्याने थोडासा धिंगाणा केलेला पण नंतर माझ्या बिदाईच्या वेळी आसवेबनून ओथंबून वाहत होता.. पण आज ...तो खूप बदलला आहे त्याचे वागणे बदलले आहे.
प्रिय वाचक हो आज अचानक त्याच्याबद्दल वाईट वाचनात येत आहे व मन अस्वस्थ होते..तो आज स्वैर झाला आहे व हवा तसा वागतो केंव्हाही त्याचे अवेळी बरसणे, महापूराणे वेढने,कधी कधी नाहीसेच होणे ,का असा छळतो आहे हेच समजत नाही....कधी कधी एखाद्या उद्धटमुलासारखे त्याचे वागणे खूप त्रासदायक वाटते अरे बाबा बरस म्हटले की गप्प बसने व थांब म्हटले की उगीच नाचून नाचून थैमान घालणे.. याने कित्येकांचे जीव हि घेतले आहेत कित्येकांना फासावर हि लटकवले.. त्यांचे संसार उध्दवस्त करताना त्याला कांही हि का वाटले नसावे किती बेशर्म झाला आहे तो ..मी ज्याच्यावर मनापासून प्रेम केले तो असा खुनी हत्यारा कसा झाला हेच समजत नाही का बदलला एवढा..?
मला वाटते आता खरी चिंतनाची गरज आहे,,कदाचित आपलेच चुकले कुठेतरी हे मान्य करायची वेळ आली आहे,त्याच्या मनाचा आपण विचारच केला नाही.. त्याचे कोणावर प्रेम आहे हे जाणूनच घेतले नाही..फक्त आणि फक्त स्वार्थीपणे वागत गेलो ..त्याच्या आवडत्या राण्या वृक्षवेली यांचीच आपण कत्तल केली,त्याची बरसण्याची ठिकाणेच नाहीशी करून कारखाने,रस्ते,इमारती उभारल्या..त्याची मुले म्हणजे जंगलातील प्राणी,पक्षी यांचाच निवारा आपण नष्ट केला मग तो कसा शांत बसेल?
पण आता हि चूक आपल्या लक्षात येत आहे,,त्यामुळे आपल्यातील सुधारणा हेच त्याचे योग्य वागण्याचे चित्र दिसून येणार आहे..माझा विश्वास आहे माझे प्रेम असे धोका कधीच देणार नाही ..तो पुन्हा बरसेन तेवढ्याच प्रेमाने,हळूवारपणे,त्याला हि आवडते चिंब प्रेमाचा पाऊस, आठवणींचा पाऊस,पैशाचा पाऊस,अल्लड खोड्यांचा पाऊस,गार गार थेंबाचा पाऊस,कवितेतील शब्दांचा पाऊस,लेखणीतील अर्थाचा पाऊस,गाण्यातील स्वरांचा पाऊस बनून बरसायला..
पुन्हा न्हाऊन टाकणार आहे तो माझ्या सह तुम्हालाही त्याच्या प्रेमात....मग तुमच्याही ओठी हे गाणे आल्याशिवाय राहणार नाही
गुज ओठांनी ओठांना सांगायचे एका पावसात दोघांनी भिजायचे ..
लेखिका-सुषमा सांगळे-वनवे
मुख्याध्यापिका,साहित्यिका
शाळा,वागदरी,उस्मानाबाद
मो.नं.9420312651