‘तो’ पहिला आला, मग तुला काय धाड भरली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:06 PM2017-09-22T17:06:39+5:302017-09-22T17:07:40+5:30
घारीची नजर आणि हाती चाबूक घेऊन धावण्यापेक्षा...
- मयूर पठाडे
तुम्हीच सांगा मुलांनी काय काय करावं?.. त्यांनी शाळेत जावं, क्लासला जावं, खेळायला जावं, संगीत, चित्रकला वगैरे तर त्याला यायलाच हवं, परीक्षेत किमान पहिल्या तिघांत तरी त्यानं असायलाच हवं.. तिसºया चौथ्या क्रमांकावर तो असेल तर मग दुसरा का नाही? पहिला का नाही?.. एकाच वेळी हजार गोष्टी त्यांनी कराव्या असं तुम्हाला वाटतं की नाही? शिवाय वर तुम्हीच म्हणता ना, दिवसभर इतकं काय काय करीत असतो, थकतो अगदी बिचारा... तरीही मग हे कर, ते करं.. असं प्रेशर त्यांच्यावर कशासाठी?
मुलांच्या मागे चाबूक घेऊन धावण्यापेक्षा आणि त्यांच्यावर सतत घारीची नजर ठेवण्यापेक्षा काही गोष्टी आपणही समजून घेतलेल्या बºया..
पालक म्हणून न करण्याच्या काही गोष्टी
१- मुलांना कधीही दूर लोटू नका. म्हणजे तुम्ही कितीही कामात असला तरी त्यांची तुम्हाला ‘कटकट’ वाटू देऊ नका. भले, त्यांचे काही प्रश्न असतील, तर त्याचे उत्तर नंतर द्या, पण ते काय सांगताहेत ते ऐकून घ्या,
२- मुलांना लाच देण्याची सवय स्वत:ला लावू नका. म्हणजे तू अभ्यास केला ना, तर तुला चॉकलेट देईन. परीक्षेत चांगले मार्कस मिळवलेस ना, तर तुला मोबाईल घेऊन देईन.. ही एक प्रकारची लाच आहे.
३- ही लाच घेण्याची सवय जर का मुलांना लागली, तर या फसव्या मोहजालातून ते कधीच बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यांच्या आयुष्याची गाडीच यामुळे रुळावरून घसरू शकते.
४- मुलांना लाच देण्याची एक बाजू, तर दुसरीकडे ‘तुला कधीच, काहीच जमणार नाही’ असं त्याचं खच्चीकरण करणं. या दोन्हीही गोष्टी अतिशय वाईट. त्यापासून पालकांनी कायम दूर राहायला हवं.
बघा, जमतं का तुम्हाला या गोष्टींपासून दूर राहाणं..