मुलांना ‘अभ्यासाचं वळण’ कसं लावायचं म्हणून स्वत:च्या डोक्याची कल्हई करुन घेतलीय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 04:34 PM2017-09-29T16:34:24+5:302017-09-29T16:35:43+5:30
नकाच लावू त्याला तसं ‘वळण’..
- मयूर पठाडे
मुलांना वळण लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांच्यापाठी सोटा घेऊन थोडीच पळायचं? मुलांनी आपल्याला दिलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण केल्याच पाहिजेत, पण त्याच्याकडून त्या का झाल्या नाहीत, हेदेखील आपण तपासायला हवं.
अनेक पालक मुलांना ‘अभ्यासाचं वळण’ लावण्यासाठी फार आग्रही असतात. त्याला कायम मारुनमुटकून अभ्यासाला बसवत असतात. रोज इतके तास अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे..
मूल तासन्तास डोळ्यांसमोर पुस्तक घेऊन तर बसतं, पण खरंच तो अभ्यास करीत असतो? खरं तर अशा धाकदपटशामुळे त्याच्या डोक्यात काहीच शिरत नाही. तो ते मुद्दाम करीत असतो, असंही नाही, पण अशा वातावरणात त्याच्या मनात भीतीच जास्त असते. आणि मनात भीतीचं काहूर माजलेलं असताना मुलाचं लक्ष तरी कसं लागणार? कसं तो मन एकाग्र करणार? त्याच्या हातात एकच गोष्ट असते. आई-बाबांनी सांगितलंय ना, अभ्यास करायचा, रोज इतके तास अभ्यासाचं पुस्तक वाचायचं, मग तो तेवढंच करतो..
पुन्हा त्याच्या मनात आणखी भीती असतेच. आता इतके तास वाचल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावरचे प्रश्न विचारले जाणार आणि त्याची उत्तरं नाही आली म्हणजे पुन्हा आपली खरडपट्टी निघणार..
त्यापेक्षा मुलांना स्वतंत्र सोडा. त्यांचा कल कशात आहे, ते लक्षात घ्या. त्यांची शिकण्याची पद्धत लक्षात घ्या.. म्हणजे काही मुलांना वाचून, काहींना पाहून, तर काहींना ऐकून जास्त कळतं. तशी परिस्थिती, तशी संधी मुलांना उपलब्ध करून द्या..
मुलं नक्कीच झपाझप पुढे जातील. त्यासाठी त्यांच्या पाठी लागण्याची आणि जमदग्नीचा अवतार घेण्याची काहीच गरज नाही.
आणि हो, आणखी एक.. थोडं काळजीपूर्वक बघा.. आपल्या मुलात काही लर्निंग डिसअॅबिलिटी तर नाही ना?.. म्हणजे ते अभ्यास करतंय, पण तरीही त्याच्या लक्षात काहीच राहात नाही किंवा त्याला कळत नाही.. अशावेळी त्याच्यात काही गोष्टींबाबत शिकण्याची अक्षमता असू शकते. अर्थातच आपलं मूल तसं आहे म्हणून त्यानं काही बिघडत नाही. ते लक्षात फक्त यायला हवं. डॉक्टरांना किंवा तज्ञांना दाखवून ते तपासून घ्या.. त्याप्रमाणे त्याला मदतीचा हात द्या.. तुम्ही म्हणता तसं ‘वळण’ त्याला आपोआप लागेल..