स्वप्नांच्या पाठी धावण्याची मनमुक्त मौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:37 PM2017-09-23T17:37:10+5:302017-09-23T17:41:32+5:30
त्यासाठी आधी उतरुन ठेवा मुलांच्या पाठीवरचं ओझं आणि पकडा त्यांचं बोट..
- मयूर पठाडे
आपण स्वत:ला कोणात पाहात असतो?.. खरंच सांगा, आपल्या मुलांमध्येच आपण स्वत:ला पाहतो की नाही? जे आपल्याला जमलं नाही, ज्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण जीवाचं रान केलं, पण नाहीच जमलं शेवटी ते.. ते सारं आपल्या मुलानं पूर्ण करावं असं आपल्याला वाटतं की नाही? त्याचसाठी तर असतो आपला सारा अट्टहास.. त्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असते.. पण असं का?..
जी स्वप्नं तुम्ही पाहिली, ती तुमची होती. स्वत:ची. खास. पण अशीच स्वप्नं तुमच्या मुलांचीही असू शकतात. तुमच्यापेक्षा वेगळी. त्यांचा ध्यास वेगळा असेल, त्यांची आवड वेगळी असेल आणि त्यापाठी धावण्याचा त्यांचा वेग, आवाका आणि जिद्दही वेगळी असेल.. असू शकते..
स्वप्नांच्या पाठी धावताना ही गोष्टही नक्की लक्षात ठेवा.. जे तुमचं स्वप्नं आहे, होतं, तेच जर मुलांचंही असेल, तर उत्तमच, पण मुलांची स्वप्नं जर तुमच्यापेक्षा वेगळी असतील, तर त्यांचं आकाशही वेगळं असेल. उडू द्या त्यांना त्यांच्या आकाशात. त्यांना फक्त मदत करा. उडतील ते त्यांचे स्वत:च. उडण्याच्या या प्रयत्नात कधीतरी ते पडतील, ठेचकाळतील, कधी रक्तही येईल, पण द्या साथ त्यांच्या स्वप्नांना. जमलंच तर मुलांचंच बोट पकडून त्यांच्याबरोबर उडायला शिका.
पण बºयाचदा काय दिसतं? आपल्या भूतकालीन स्वप्नांना दुसºयांचे पंख लावून उडण्याच्या प्रयत्नात आपण मुलांचेच पंख कापायला जातो.. आपल्याही नकळत आपल्या स्वप्नांचा बोजा त्यांच्या खांद्यावर टाकून उडण्यापूर्वीच आपण मुलांना खाली बसवतो. एवढा बोजा घेऊन कशी उडतील ती?..
आपण आपल्या स्वप्नांसाठी जगलो, पण मुलांची स्वप्नं काय आहेत, कुठल्या आकाशात त्यांना झेप घ्यायचीय आणि कुठल्या विश्वात जायचंय, याची साधी दखल तरी घेतो आपण?
मुलांच्या पाठीवर ठेवलेलं आपल्या स्वप्नांचं ओझं उतरवा आणि मग बघा.. त्यांच्या स्वप्नांना नवे रंगीत पंख फुटतील.. ते स्वत: तर त्यासोबत उडतीलच, पण तुम्हालाही अवकाशात मुक्त भरारी घेतल्याचा आनंद मिळेल..