मुलांना होऊ द्या की मोठं स्वत:च, स्वत:हून..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 04:09 PM2017-10-30T16:09:40+5:302017-10-30T16:10:39+5:30
तरच वाढेल त्यांचा आत्मविश्वास..
- मयूर पठाडे
अनेक पालकांना आपल्या मुलांबाबत एका गोष्टीची मोठी चिंता वाटत असते. अभ्यासात तर खूप हुशार आहे, अभ्यासातलं त्याला काहीही विचारा, झटक्यात तो उत्तर देईल, घरातही तो अशिय शार्प आहे, पण बाहेर गेला, की त्याची पार ‘गोगलगाय’ होते. कोणाशीच धड बोलत नाही कि उत्तर देत नाही. घरात प्रत्येक बाबतीत ‘वाघ’ असलेलं आमचं मूल बाहेर कुठे चारचौघांत गेलं की त्याची ‘शेळी’ होते! अगदी नेहमीच्या परिचित लोकांकडे, नातेवाईकांकडे गेलं तरी त्याची बोलती एकदम बंद होते आणि ते लाजाळूचं झाड बनतं..
अभ्यासकांनी याचं उत्तर शोधलं आहे. त्यांच्या मते मूल अभ्यासात हुशार आहे, कारण बºयाचदा तुम्ही त्याची घोकंपट्टी करुन घेतलेली असते. परीक्षेतील ‘अपेक्षित’ प्रश्नांचा, त्याच्या अभ्यासक्रमाचा रट्टा पालक म्हणून तुम्हीच त्याच्याकडून मारुन घेतलेला असतो, पण ज्या गोष्टींनी कॉन्फिडन्स येईल, मुलांचा आत्मविश्वास वाढेल, यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्याच्या वाट्याला येऊच दिलेल्या नाहीत किंवा ‘अभ्यासा’च्या नादात ‘इतर’ गोष्टींसाठी त्याला वेळच मिळालेला नाही.
या इतर गोष्टी म्हणजे काय?.. अभ्यासकांचं म्हणणं आहे, मुलांनी एकवेळ ‘अभ्यास’ केला नाही तरी चालेल. मुळात या वयातल्या मुलांवर अभ्यासाची सक्ती करायलाच नको. त्याऐवजी विविध गोष्टींची ओळख त्याला करुन द्यायला हवी. तीही अगदी सहजपणे. ‘अभ्यासाचं’ लेबल त्यामागे नको. अशा गोष्टी जर आपलं मूल करीत असेल, आपल्या बरोबरच्या मित्रांमध्ये वावरत असेल, त्यांच्याशी खेळत असतानाच, त्यांच्याशी भांडत असेल, काही वेळा कोणाला मारत असेल, तर काही वेळा मार खाऊन येत असेल.. पालक म्हणून तुम्हाला अशा वेळी काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण मुलांची भांडणं आणि मारामाºयांमध्ये अगदीच गरज पडल्याशिवाय तुम्ही मधे पडू नका. मुलं त्यांचे प्रश्न त्यांच्या पद्धतीनं अतिशय उत्तम सोडवतात आणि पुन्हा लगेच एकत्रही येतात. एकोप्यानं खेळायलाही लागतात. मुलांचा आत्मविश्वास वाढतो तो याच गोष्टींतून. समाजात कसं वावरायचं, आपल्या क्षमता काय आहेत आणि त्या कशा पद्धतीनं वापरायच्या, तडजोड कुठे करायची, कुठे थांबायचं.. यासारख्या अनेक गोष्टी मुलं त्यातूनच शिकतात..
त्यामुळे मुलांच्या फार मागे मागे न राहता, त्यांच्यावर ‘वॉच’ न ठेवता थोडं लक्ष असू द्या, पण मुलांना त्यांचं त्याचं मोठं होऊ द्या.. त्यामुळे ती खरंच मोठी होतील आणि तुम्हालाही मोठं करतील..