ऑफिसचे १४-१४ तास करत होता काम, मालकाने ७.८ कोटींचे बक्षीस दिले; पण बायकोने घटस्फोट मागितला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:16 IST2025-02-14T16:15:40+5:302025-02-14T16:16:29+5:30
ब्लाईंड नावाची एक प्रोफेशनल लोकांसाठी कम्युनिटी वेबसाईट आहे. त्यावर या व्यक्तीने आपबीती सांगितली आहे.

ऑफिसचे १४-१४ तास करत होता काम, मालकाने ७.८ कोटींचे बक्षीस दिले; पण बायकोने घटस्फोट मागितला...
घरी बसून काय बायकोचा चेहरा बघणार का, असे म्हणणाऱ्या एलअँडटीच्या सीईओंना लोकांनी तेव्हा फैलावर घेतले होते. या महाशयांना रविवारीही कर्मचारी कामावर हवे होते. आता सारखे ऑफिस-ऑफिस करणाऱ्या एका टेक कंपनीच्या कर्मचाऱ्याने आपले कौटुंबिक आयुष्य कसे बरबाद झाले त्याचा किस्सा सांगितला आहे.
ब्लाईंड नावाची एक प्रोफेशनल लोकांसाठी कम्युनिटी वेबसाईट आहे. त्यावर या व्यक्तीने आपबीती सांगितली आहे. प्रमोशन मिळविण्याच्या इच्छेने गेली तीन वर्षे तो १४-१४ तास कंपनीत काम करत होता. घरी कमी लक्ष देत होता. घरातील अनेक चांगले-वाईट प्रसंगाला तो जाऊ शकला नाही. कामावर खूश होऊन कंपनीने त्याला ७ कोटी रुपयांचे भरघोस बक्षीसही दिले. परंतू, बायकोने घटस्फोट मागितला, असा अनुभव त्याने सांगितला आहे.
करिअरचे लक्ष्य गाठले, मला ७.८ कोटी रुपयांचा पगार मिळाला, तसेच सिनिअर मॅनेजरची पोस्ट देण्यात आली. परंतू आता एवढे सगळे मिळूनही आयुष्य रिते झाले आहे. हाय प्रोफाईल नोकरीच्या मागणीने माझे खासगी आयुष्य पिळवटून टाकले आहे, असे त्याने नमूद केले आहे.
नेमके काय झाले...
मी वरिष्ठ पदावर नोकरी पत्करली होती. परंतू मला प्रमोशन हवे होते. मी कंपनीकडे मागितले, त्यांनी माझे काम वाढविले. माझा आवाका वाढत गेला.मी अशा पोझिशनवर पोहोचलो जिथे मी युरोप आणि आशियाच्या टीमसोबत समन्वय करायचो. सकाळी ७ ला मिटिंग सुरु व्हायची ती रात्री ९ ला संपायची. मुलीचा जन्म झाला तेव्हाही मी मिटिंगमध्येच होतो. तिच्या जन्मानंतरही मी तिला वेळ देऊ शकलो नाही, बायकोला मदत करू शकलो नाही. तिला जेव्हा डिलिव्हरी डिप्रेशन झाले तेव्हाही मी मिटिंगमध्येच. आता मला प्रमोशन मिळालेय, पण तिने घटस्फोट मागितला आहे, अशा शब्दांत त्याने आपले दु:ख व्यक्त केले.
मला आज प्रमोशन मिळाल्याचे समजले आहे. परंतू मला मी जेवढा अपेक्षा केलेला तेवढा आनंद झाला नाहीय. मी रिकामेपणा आणि उदासपणा अनुभवत आहे. माझ्याकडे मुलगी नाहीय, पत्नी नाहीय. मी आयुष्यासोबत काय करतोय. खूश कसे रहावे, असा सवाल त्याने या वेबसाईटवर विचारला आहे.