या '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 11:26 AM2018-04-20T11:26:51+5:302018-04-20T17:34:24+5:30
बलात्काराच्या घटनांना कोणते घटक कारणीभूत आहेत आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी काय करायला हवे, याबाबत घेतलेला हा आढावा.
अलिकडे झालेल्या अल्पवयीन मुलींवरचा बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्यांवरुन संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. तसे पाहिले तर या घटना पहिल्या आणि शेवटच्या नाहीत. देशभरात अल्पवयीन मुली तसेच महिलांवरील बलात्कार, हत्या, अॅसिड हल्ला यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्या रोजच ऐकायला मिळत आहेत. बलात्काराच्या घटनांना कोणते घटक कारणीभूत आहेत आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी काय करायला हवे, याबाबत घेतलेला हा आढावा.
* महिलांबद्दलची मानसिकता
आजदेखील महिलांना फक्त उपभोग्य वस्तू म्हणून शोषक नजरेने पाहिले जाते. तिच्याकडे कधीही सन्मानाने पाहिले जात नाही, याला जबाबदार आहे आपली मानसिकता. आणि ही मानसिकतेला खतपाणी घातले जाते ते आपल्या समाजातूनच. महिला-पुरुष भेदभाव घराघरात बघावयास मिळतो. 'तिला काय समजते...', या विचारसरणीने महिलांना घरात खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते. पुरुष प्रधान संस्कृतिचे हेच संस्कार लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबले जातात आणि महिलांना दुय्यम समजण्याची मानसिकता निर्माण होते. यासाठी मुलांना लहानपणापासूनच स्त्रीचा सन्मान करण्याची चांगली शिकवण दिली गेली पाहिजे. प्रत्येक घरात तिला मान दिला गेला पाहिजे. तरच तिच्याबद्दलची मानसिकता बदलण्यास मदत होईल आणि या समाज विघातक घटनांना आळा बसेल.
* व्यसनाधिनता
व्यसनाधिनता पुरुषांच्या विचारांना विकृत करत असते. व्यसनांमुळे स्वत:वर नियंत्रण राहत नाही, त्यामुळे चुकीची कृती घडण्याची शक्यता बळावते. अशावेळीच कोणतीही महिला त्याला उपभोग्य वस्तू म्हणूनच दिसत असते. आतापर्यंत घडलेल्या सर्व घटनांना अभ्यास केला तर सुमारे ८५ टक्के बलात्काराच्या घटनांचे कारण नशा आहे. आपल्या देशात मद्य असे विकले जाते, जसा मंदिरात प्रसाद. ठिकठिकाणी आपणास मद्य विक्रीचे दुकाने बघावयास मिळतात, त्याठिकाणी मद्य घेणाऱ्यांची गर्दी पाहिली तर चकित करणारी असते.
* पुरुषांची मानसिक दुर्बलता
महिलांच्या शरीराविषयीच्या नको त्या गप्पांपासून इंटरनेटवरील अश्लिल व्हिडिओंपर्यंत बहुतांश पुरुषांची दुर्बल मानसिकता बघावयास मिळते. आज मोफतच्या इंटरनेटमुळे सहज पॉर्न चित्रपट उपलब्ध होतात. पॉर्न चित्रपट आणि उत्तेजक पुस्तके पुरु षांच्या मानसिकतेला दुर्बल करतात. पॉर्न पाहून त्याला मिळालेल्या उत्तेजनांमुळे तो आपल्या मर्यादा विसरतो. त्यामुळे निर्माण झालेला तणावच बलात्काराला कारणीभूत ठरतो.
* आंबट शौकिनांचा सुळसुळाट
गाव तसेच शहरांतील काही निमर्नुष्य जागी टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आंबट शौकिनांचा सुळसुळात असतो. त्यातच फार्म हाउस तर अशा कामांचा निपटारा करण्यासाठी गर्भश्रीमंतांसाठीचे एक साधनच होय. मोठमोठे नेते, अधिकारी, उद्योगपती आपल्या फार्म हाउसची उभारणी करतात, मात्र त्याठिकाणी नेमके काय चालते याची साधी कोणी चौकशीही करत नाही. अशा प्रकारचे ठिकाण पोलीस व प्रशासनापासून लांब आणि सुरक्षित असले तरी एखाद्या एकट्या महिलेसाठी खूपच असुरक्षित असते. महिलेच्या किंचाळ्या दुरदूरपर्यंत कोणाला ऐकू जाणार नाहीत आणि कोणीही मदतीला धावून येणार नाही. बलात्काराच्या सुमारे ६० टक्के घटना अशाच प्रकरणाच्या समोर आल्या आहेत.
* कठोर शिक्षेचा अभाव
आपल्या देशाची न्यायव्यवस्था लवचिक आहे, हे सर्वांनाच माहित आहे. अशा प्रकरणात जर कायदा ताठर बनला तर गुन्हेगारी प्रवृत्तीला बºयापैकी आळा बसू शकतो. न्याय मिळण्यासाठी लागणारा कालावधी हा देखील बलात्काराच्या घटनांना कारणीभूत आहे. तसे पाहिले तर प्रशासन आणि पोलीस कधीही कमकुवत नाहीत, कमकुवत आहेत त्यांची विचारसरणी आणि त्या समस्येशी लढण्याची त्यांची इच्छाशक्ती. एखादा गर्भश्रीमंत जेव्हा असा गुन्हा करतो तेव्हा प्रशासकीय शिथिलता त्याला शिक्षा न करता त्याच्या बचावासाठी उभी राहते. पोलिसांची काठी लाचार, गरिबांवर चालते तर सक्षमांसमोर तिच काठी सहारा बनते. आतापर्यंत अशा बऱ्याच घटनांमध्ये सक्षम अपराधी दोषी असूनही निरपराध म्हणून बाहेर पडले आहेत. यामुळेदेखील बलात्कारासारख्या घटनांना जास्त बढावा मिळतो. अशा दुष्कृत्य करणाऱ्याला तर त्वरित आणि कठोर शिक्षा व्हायला हवी, मग तो कुणीही असो. अशी शिक्षा व्हावी की त्या शिक्षेची समाजात जरब बसली पाहिजे. जेणेकरुन ती चुक पुन्हा कोणी करायला नको.
* आज आपण सर्वांनी बलात्काराला जात, धर्म याचा चष्मा लावून पाहायला नकोय. बलात्कारी कुठेही असू शकतात, कोणत्याही चेहऱ्यामागे, कोणत्याही बहाण्याने, कोणत्याही अंदाजात. दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाले तर बलात्कार ही समाजाला लागलेली भयंकर कीड असून ती समाजाला पोखरत चालली आहे. तिला वेळीच ओळखून आम्हा सर्वांना एकमत होऊन, एकजुट होऊन या किडीला मुळासकट नष्ट करायचे आहे.