दरवेळी नव-याचे चुकते का? बायकोही कमी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:00 PM2019-04-08T12:00:10+5:302019-04-08T12:07:11+5:30
नव-याच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या बायकोचा संयम टिकत नसल्याने त्या नात्याची वीण उसवली जात असल्याचे कोर्टाच्या पायरीवर दिसून येत आहे..
- युगंधर ताजणे-
पुणे : वाढत्या जीवघेण्या स्पर्धेतून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठीचा सततचा संघर्ष, बदलती जीवनशैली, घरात मुलाचे आई-वडील म्हणजे अडगळ ही मनात दृढ झालेली भावना, जोडीला सोशल माध्यमांवर वाढलेला मुक्त वावर या सर्वांचा प्रतिकूल परिणाम वैवाहिक नात्यावर होत आहे. दरवेळी नव-याचे चुकते असे म्हणणा-यांकडून बायकांकडूनही चुका घडतात, याकडे काणाडोळा केला जातो. नव-याच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या बायकोचा संयम टिकत नसल्याने त्या नात्याची वीण उसवली जात असल्याचे कोर्टाच्या पायरीवर दिसून येत आहे.
घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये आता पुरुषांपेक्षा स्रियांकडून दावा दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात 23 ते 35 वयोगटातील जोडप्यांचा काडीमोड होण्याची टक्केवारी साधारण 50 ते 60 टक्यांच्या घरात आहे. आपण कमवते आहोत, स्वत:च्या पायावर उभे आहोत या भावनेतून वाढलेला ‘‘इगो’’ तसेच यातून आई वडिलांना दूर करुन नवीन घर घेण्याचा नव-यामागे लावलेला तगादा यामुळे नात्यांमधील गोडवा संपत चालला आहे. सोशल माध्यमांव्दारे स्वत:चे खासगीपण जपण्याने संघर्ष निर्माण होत आहे. अनेक महिला यामुळे निराशेच्या गर्तेत गेल्या आहेत. फेसबुक, व्हाटसअप यातून अनोळखी व्यक्तिशी झालेली ओळख त्यातून वाढलेले चँटिंग यामुळे संसारात कटूता येत आहेत. चंगळवादी वृत्तीतून पतीकडून केलेल्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून अपेक्षाभंग झाल्यास तात्काळ नाते तोडून टाकण्यापर्यंत पावले उचलली जात आहेत. भारतीय दंड संहिता 498 व घरगुती हिंसाचार कायदा 2005 चा महिला गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे. माहेरच्या लोकांचा मुलीच्या संसारात प्रमाणापेक्षा वाढलेला हस्तक्षेप हा देखील घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
* बायकोचे हे चुकते ....
- सासु-सासऱ्यांना टोचून बोलणे, त्यांचा तिरस्कार करणे, त्यांच्यापासून लांब राहण्याची कारणे देत नवीन घरोब्याचा अट्टहास.
- घरांतील माणसांपेक्षा व्हाटस अप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी आभासी जगात वेळ घालवणे. त्यावरुन प्रश्न केल्यास ’प्रायव्हसी’चा मुद्दा पुढे करणे.
- पाश्चिमात्य संस्कृतीतील गोष्टींची माहिती न घेता त्याचे अनुकरण संसारात करणे. चित्रवाहिन्यांवरील वेशभुषा, खानपान, शॉपिंग, याविषयांवरील कार्यक्रम पाहून त्याप्रमाणे ’आपण ते करुन पाहायलाच हवे,’ असा धोशा लावणे अनेक नवरोबांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे.
...........
* लग्नापूर्वी समुपदेशनाची संकल्पना रुजली नाही
पाश्चिमात्य देशांमध्ये लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्याकरिता समुपदेशन केले जाते. मात्र आपल्याकडे हा विषय अनेकदा मुलगा आणि मुलीच्या ’’ इगो’’ चा विषय होतो. मी सर्वोत्कृष्ट असून मला समुपदेशनाची गरजच काय, असा प्रश्न मुलाला व मुलीला पडतो. यातून दोघांच्या भावी संसारी जीवनाकरिता कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची त्यांना माहिती होत नाही. एकमेकांच्या अपेक्षा समजून घेता येत नाहीत. दोघांच्या कौटूंबिक पार्श्वभूमीची माहिती होत नसल्याने त्याने देखील नात्यांमध्ये कटूता येत असल्याचे घटस्फोटाच्या प्रकरणांतून समोर आले आहे.
........................
* आपण स्वत:च्या पायावर उभे आहोत. आपल्याला चांगला पगार आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना मुलींमध्ये अहंपणाची भावना निर्माण झाली आहे. लग्न झाल्याबरोबर काही दिवसांतच मुलीला घरात मुलाचे आई वडिल नको असतात. तिला तिची ‘‘प्रायव्हसी’’ जपायची असते. मुलींनी संसाराची व्याख्या समजून घेण्याची गरज आहे. समजून घेणे आणि स्वीकारणे या दोन गोष्टी त्यांनी संसार करताना लक्षात घ्यायला हव्यात. मात्र ते त्यांच्या पचनी पडताना दिसत नाही. नव-याकडून सतत अपेक्षा करत राहणे त्या पूर्ण न झाल्यास त्याला पाठींबा देण्याऐवजी वाद सुरु करणे चूकीचे आहे. काळानुसार बदलणा-या गोष्टींचा कितपत परिणाम आपल्या वैवाहिक नात्यावर होऊ द्यायचा हे मुलींना ठरवता यायला हवे. -अॅड. सुनीता जंगम ( कौटूंबिक न्यायालय, पुणे)