साखरपुडा झाल्यावर जास्तीत जास्त तरूण-तरूणी करतात 'या' चुका, ज्या पडू शकतात महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:32 PM2023-07-04T13:32:07+5:302023-07-04T13:32:30+5:30
Relationship Tips : याच काळात कपल्स भविष्याबाबत अनेक स्वप्ने बघतात आणि रंगवतात. काहींना भेटण्याची संधी असेल तर भेटीही घेतात. या सगळ्यामागे एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
Relationship Tips : लग्न हा विषय कुणाच्याही आयुष्यात फार महत्वाचा असतो. फार विचार करूनच तो करावा लागतो. दोन अनोळखी व्यक्ती सोबत येतात आणि नव्या आयुष्याला सुरूवात करतात. साखरपुडा झाला की, एक वेगळंच जीवन सुरू होतं. दोघांनाही एकमेकांची ओढ वाटू लागते. तरूण आणि तरूणीचा साखरपुडा आणि लग्नादरम्यानचा काळ फार खास असतो. याच काळात कपल्स भविष्याबाबत अनेक स्वप्ने बघतात आणि रंगवतात. काहींना भेटण्याची संधी असेल तर भेटीही घेतात. या सगळ्यामागे एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
लग्नाआधी एकमेकांना जाणून घेणे गरजेचे आहे पण अनेकदा काही कपल्स यादरम्यानच्या काळात अशा काही चुकाही करतात. ज्यामुळे नातं बिघडण्याची शक्यता जास्त असते. मग ते बोलण्यातून असो वा वागण्यातून. जास्त मोकळेपणा कधीकधी अंगलट येतो. अशात लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काही चुका ज्या कपल्स करतात.
वाढवून सांगणे
लग्नाआधीच्या पहिल्या भेटीत अनेकदा कपल्स हे एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी स्वत:बाबत मोठमोठ्या बढाया मारतात. पण हे सांगताना काहीजण हे विसरतात की, समोरचा व्यक्ती त्याच्या घरातीलच नाहीतर आयुष्याचा भाग होणार आहे. पुढे जाऊन सगळंकाही त्याला कळणारच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी खोट्या सांगू नये नाहीतर याने नात्यात दरी निर्माण होऊ शकते.
प्रामाणिकपणा
अनेकदा कपल्स लग्नाआधी आपल्याबाबत खोटं सांगतात जे फार चुकीचं आहे. आपल्या भूतकाळाबाबत आपल्या पार्टनरला खरं सांगायला हवं. नंतर त्याबाबत माहिती मिळाल्यावर तुमच्या पार्टनरला धक्काही बसू शकतो. पण हे सांगण्याआधी आपल्या पार्टनरचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्या त्यानंतरच या गोष्टी सांगा.
कंट्रोल ठेवत नाहीत
अनेकदा कपल्स साखरपुडा झाला की, एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात. ते लग्नांपर्यंत वाट पाहू शकत नाहीत. अशात बोलण्यापर्यंत, ऐकमेकांना जाणून घेण्यापर्यंत ठिक आहे पण लग्नाआधी फिजिकल रिलेशन ठेवणे चुकीचं ठरु शकतं. जर लग्नाआधीच तुम्ही तुमच्या पार्टनरमागे या गोष्टीसाठी तगादा लावत असाल, त्याबाबत सतत बोलत असाल तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या नजरेत तुमचं चुकीचं इम्प्रेशन पडू शकतं.
जास्त बोलणं अडचणीचं
सगळेच लग्न जुळल्यावर आपल्या पार्टनरसोबत बोलण्यासाठी उत्सुक असतात. अनेकजण जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत बोलण्यात घालवतात. संवाद योग्यच आहे पण लग्नाआधी इतकंही बोलू नये की, लग्नानंतर तुमच्यात काही रोमांच उरणार नाही. आताच पार्टनरला सगळं सांगितलं तर लग्नानंतर काय सांगाल?