घटस्फोट घेऊन पस्तावले! गुजरातचे प्रोफेसर-डॉक्टर दांम्पत्याला पुन्हा प्रेम झाले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:20 PM2023-02-21T12:20:47+5:302023-02-21T12:21:11+5:30
गुजरातच्या गांधीनगरमध्ये अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रोफेसर पती आणि डॉक्टर पत्नी यांच्यातील हा प्रकार आहे.
अहमदाबाद : लग्न केले, बिनसले, घटस्फोटासाठी खटला भरला आणि तेव्हा त्यांच्यात पुन्हा प्रेम खुलले पुन्हा लग्नासाठी या जोडप्याला किती काळ वाट पहावी लागली असेल... तुम्ही विचार करा... घटस्फोट घ्यायला चार वर्षे गेली, त्या घटस्फोटाचे रेकॉर्ड हटविण्यासाठी त्यापेक्षा दुप्पट काळ गेला. या दांपत्याला घटस्फोट घेऊन पस्तावल्यासारखे वाटले आहे.
गुजरातच्या गांधीनगरमध्ये अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रोफेसर पती आणि डॉक्टर पत्नी यांच्यातील हा प्रकार आहे. या दोघांचे २००६ मध्ये लग्न झाले होते. त्यांना २००९ मध्ये एक मुलगाही झाला. मात्र नंतर त्यांच्या नात्यात कटुता आली आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अचानक पतीने रागाच्या भरात कोर्टात जात खटला दाखल केला. २०१५ मध्ये गांधीनगर फॅमिली कोर्टाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.
पतीने २०११ मध्ये खटला दाखल केला होता. गांधीनगर कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पत्नीने गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्यांचे लग्न पूर्ववत करण्यास सांगितले. पत्नीच्या निर्णयाला आव्हान देण्याऐवजी पतीने उच्च न्यायालयात पत्नीच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका दाखल केल्याच्या दिवसापासून घटस्फोटाच्या आदेशाला स्थगिती दिली.
आपल्या मुलामुळेच आपण पुन्हा एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. एका संयुक्त निवेदनात दोघांनी ते एकत्र राहत असल्याचे आणि सर्व वाद मिटल्याचे म्हटले आहे. जे वाद होते ते सामंजस्याने सोडवण्यात आले आहेत. पुनर्विवाह हा एक पर्याय आहे, परंतू असे असताना कोर्टात घटस्फोट घेतल्याच्या नोंद ठेऊ इच्छित नाही असे त्यांचे म्हणणे होते. यासाठी आता आठ वर्षांनी उच्च न्यायालयाने त्यांना कनिष्ठ कोर्टातून पूर्ण खटलाच मागे घेण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. पुन्हा कायदेशीर एकत्र येण्यासाठी या जोडप्याला १२ वर्षांचा वनवास भोगावा लागला आहे.