बघा, कसं होतंय तुमचं मूल स्वार्थी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:15 PM2017-09-25T13:15:41+5:302017-09-25T13:18:22+5:30
‘घेण्या’बरोबरच मुलांना ‘देण्या’ची सवय लावण्यासाठी..
- मयूर पठाडे
मुलं नेहमीच गोड असतात, गोड दिसतात. त्यांचं कित्ती कौतुक करावंसं वाटतं.. बरोबर ना? पण चुकताय तुम्ही. म्हणजे वर जे निरीक्षण तुम्ही मांडलंय, त्यात खोटं काहीच नाही, पण ते पूर्णत: खरंही नाही. अनेक मुलांच्या लोभस हास्यामागे स्वार्थीपणाही लपलेला असतो. आपल्याला वरवर ते कळत नाही किंवा ‘मुलंच ती, करणारच असं..’ म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. याकडे खूपच बारकाईनं पाहिलं पाहिजे आणि आपली मुलं ‘सगळं मलाच पाहिजे, दुसºयाला काहीच नको’, अशी वागत असली तर त्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्षही दिलं पाहिजे.
अभ्यासकांचंही हेच निरीक्षण आहे. मुलं जर स्वार्थीपणाकडे झुकायला लागली, तर त्यांच्या भविष्यावरच त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपली मुलं स्वार्थी बनण्याआधीच काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
स्वार्थीपणापासून मुलांना कसं वाचवाल?
१- एकतर मुलांना लहानपणापासूनच घेण्यापेक्षा ‘देण्याची’, शेअर करण्याची जास्तीत जास्त सवय लावली पाहिजे. आपणही तेच करतो, हे आपल्या कृतीतून मुलांना दिसलंही पाहिजे.
२- मुलांना कोणतीही गोष्ट देताना किंवा त्यांनी ती हवी असताना शक्यतो दोन पर्याय द्यावेत. ही किंवा ती. म्हणजे एखाद्या गोष्टीला पर्याय असू शकतो आणि त्याच्यावरच्या मालकीहक्कावरची त्यांची भावना कमी होऊ शकते.
३- मुलांच्या वागणुकीकडे सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे. मुलं जर स्वार्थीपणा करायला लागली, तर त्यांना त्यांच्या नकळत त्याची जाणीव करून देताना देण्याचा आनंदही त्यांना समजावून द्यायला हवा.
४- मुलं जर काही चिंतेत, काळजीत असतील, एखाद्या गोष्टीच्या अभावामुळे, ती न मिळाल्यामुळे ती दु:खात असतील, तर त्यांचं दु:ख, वेदना त्यांच्या पातळीवर जाऊन समजावून घेताना, ती गोष्ट म्हणजेच सर्वस्व नाही, याची जाणीवही मुलांना करुन द्यायला हवी.
५- एखादा निर्णय आपण घेतल्यानंतर त्यावर आपण ठामही राहिलं पाहिजे. एखादी गोष्ट मुलासाठी चांगली नाही, हे आपण तारतम्यानं ठरवल्यावर ती गोष्ट मुलासाठी कशी अयोग्य आहे, हे त्याला समजावून देतानाच आपला निर्णय कायमही ठेवायला हवा. चॉकलेट चांगलं नाही, असं म्हणून थोड्या वेळानं चॉकलेटच बक्षीस म्हणून द्यायचं, यातला फोलपणा मुलांना चांगलाच समजतो..