जोडीदारच, पण आभासी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 08:07 AM2024-12-08T08:07:40+5:302024-12-08T08:07:48+5:30
काही दिवसांपूर्वी एका परिचयाच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे व्हर्च्युअल गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्याने निराशावस्थेत गेलेल्या पौगंडावस्थेतील मुलाची केस आली. अशी व्हर्च्युअल गर्लफ्रेंडही असू शकते, हेच पालकांना माहीत नव्हतं...
- सोनाली लोहार
वैद्यकीय व्यावसायिक
त्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे असे तंत्रज्ञान आहे, ज्यामार्फत मशिन्स किंवा कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअर्स मानवी बुद्धिमत्तेसारखी कामे करतात. जॉन मेककार्थी यांनी १९५६ मध्ये या तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होत गेले. आज आपण काळाच्या अशा उंबरठ्यावर उभे आहोत की, मानवी अस्तित्व आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांतील सीमारेषा धूसर झाली आहे. ‘सिरी’सारखं व्हर्च्युअल सहायक कॉम्प्युटर ॲप, जे तुमच्याशी माणसासारखं बोलतं, तुमच्या सूचनाबरहुकूम तुमची कामं करतं हे त्याचं एक छोटं उदाहरण.
बाह्य जीवनाचा भाग झालेल्या या तंत्रज्ञानाने आता मानवी मनाचाही ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एका परिचयाच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे व्हर्च्युअल गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्याने निराशावस्थेत गेलेल्या पौगंडावस्थेतील मुलाची केस आली. अशी व्हर्च्युअल गर्लफ्रेंडही असू शकते, हेच पालकांना माहीत नव्हतं.
सहायक म्हणून व्हर्च्युअल पार्टनर असणं हे वेगळं; पण रोमँटिक रिलेशनशिपसाठी ‘एआय’पुरस्कृत पार्टनर तयार करणं हे मात्र अत्यंत धोकादायक आहे. अशी आभासी नाती आज घराघरांत पोहोचली आहेत.
तुम्ही लहान मुलांना खेळण्याशी खेळताना बघितलं आहे का ? ते मूल त्या खेळण्याला जेवण भरवतं, झोपी घालतं, कपडे घालतं, रागवतं, मारतं, कुशीत घेऊन झोपी जातं. मानसशास्त्रात याला ‘ॲन्थ्रोपोमोर्फीझम’ ही संज्ञा आहे, म्हणजे मूर्त किंवा अमूर्त गोष्टींना मानवसदृश्य गुण बहाल करून मानवासम वागवणं. एआय रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आपण प्रोग्रामच्या माध्यमातून असे गुण बहाल करून आपल्याला जसा हवा तसा पार्टनर तयार करू शकतो. अगदी रंग, रूप, आवडीनिवडी, भाषा, विचार सगळं काही आपल्या मनाप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे. याला मानसशास्त्रात प्रोजेक्शन म्हणतात, म्हणजे आपल्या अंतर्गत जीवनाचा काही भाग हा खरोखरच दुसऱ्याचं वैशिष्ट्य आहे असं भासवणं आणि आपण इतर लोकांवर हाताळू शकत नसलेल्या भावनांना याद्वारे वाट मिळवून देणं.
का कराव्याशा वाटतात अशा आभासी रिलेशनशिप ही विचार करण्यासारखी बाब आहे. त्याची काही कारणे म्हणजे असह्य एकाकीपण, भावनिक आधाराची गरज, कसलेही मूल्यमापन न होता व्यक्त होण्याची गरज, नाकारलं न जाण्याची खात्री, ज्यावर संपूर्ण मालकी आहे असं नातं, सामाजिक चिंता आणि कमकुवत झालेला आत्मसन्मान या सगळ्यांपासून दूर, एक कल्पनारम्य जग - ज्यात सेक्स्युअल फॅन्टसीही आल्या.
नकळत या प्रवासात आपण आपल्या मनाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा ताबा एका अदृश्य शक्तीच्या हाती कधी दिला, याचा पत्ताही लागत नाही. एआयने तयार केलेला तुमचा पार्टनर हा तुम्ही दिलेल्या तुमच्या माहितीच्या अल्गोरिदमवरच बनतो. टेक्नॉलॉजी या माहितीचा उपयोग करून मानसिक आणि आर्थिक स्तरावर गैरमार्गाने तुमचे कधीही शोषण करू शकते. डीपफेक हे याचंच एक उदाहरण. हे तंत्रज्ञानच असं तयार केलंय की, यावरील तुमच्या मानसिक परावलंबित्वामुळे तुम्ही यातून बाहेर येऊ नये. व्हर्चुअल पार्टनर्सकडे अनुभवलेले सुखद क्षण तुम्ही मग खऱ्या आयुष्यातील पार्टनर्सकडूनही अपेक्षायला लागता आणि विसरून जाता की, खरा पार्टनर हाडामांसाचा बनलेला आणि अतिशय गुंतागुंतीचं मानवी मन असलेला मनुष्यप्राणी आहे. हळूहळू हा प्रवास वास्तवाकडून परत एकदा तुम्हाला कोशात घेऊन जातो.
खरे तर दोन मानवी मने ही एकसारखी नसल्याने नेहमीच एकमेकांना आव्हानं देत राहतात, जे मनुष्याच्या बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत पूरक असतं. एआयला मनही नसतं आणि भावनाही. मानवी मेंदू भावनिक बंधात व्हर्चुअल आणि प्रत्यक्ष यांत फरक करू शकत नाही आणि मग यातून बाहेर पडणं अशक्यप्राय होतं.
अशा वेळी परत एकदा निग्रहाने कुटुंब, मित्र यांना नव्याने भेटा, मानवी संबंधांची संपन्नता समजून घ्या. एक गोष्ट जी एआय भविष्यातही (कदाचित) देऊ शकणार नाही, ती म्हणजे मानवी स्पर्श. तो अनुभवा, त्यात आधार शोधा, व्यक्त होत राहा, गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्या; पण वास्तवाचा हात कधीही सोडू नका. अन्यथा अवस्था अशी होईल की... ( संदीप खरेंचे शब्द) -
मी सुखाला पाळले, बांधून दारी माझिया,
ते सुखाने झोपले, मी गस्त द्याया लागलो...