त्या मोरपंखी दिवसांसाठी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:34 PM2017-09-23T17:34:51+5:302017-09-23T17:36:03+5:30
आपल्या आजूबाजूची जळमटं दूर सारा आणि डोकवा थोडं बालपणात..
- मयूर पठाडे
आठवतंय तुम्हाला, यापूर्वी कधी तुम्ही तुमच्या स्वत:साठी, फक्त स्वत:साठी म्हणून एखादी गोष्ट केलीय?.. कसं आठवणार?.. कारण विसरुनच गेलोय आपण स्वत:साठी जगणं. कोणतीही गोष्ट आजवर आपण केलीय, ती कायम दुसºयासाठी. मग ती कधी कुटुंबासाठी असेल, कधी दुसºयांना चांगलं वाटावं म्हणून असेल, आपल्याशिवाय दुसरं कोणीच करणार नाही म्हणून असेल.. कितीतरी कारणं..
पण.. माझ्या स्वत:साठी मी केलंय.. असं कधी आपल्या आयुष्यात दिसतच नाही.
अगदी साध्या साध्या गोष्टी..
लहानपणी तुम्हाला पतंग खेळायला खूप आवडायचं, गोट्या खेळतांना तर तुम्ही देहभान विसरून जायचात. लहानपणी गल्लीत छप्पापाणी, डब्बा गुल, आबाधोबी, लिंगोरचा.. कितीतरी खेळ.. पण अख्खा दिवस कसा मजेत जायचा.. मग कुठे गेली ही गंमत? कुठे गेले ते जवळचे सगळे मित्र?.. ज्यांच्याशिवाय आपल्याला एक क्षणही कधीच करमत नव्हतं?.. जीवाला जीव देत होतो आपण त्यांच्यासाठी.. मग आज काय झालंय?.. का संवाद त्यांच्याशी तुटलाय? विचार करा स्वत:शीच. खरंच आपण इतकी कामात असतो, खरंच आपल्याला इतका शिणवटा आलाय, की आपल्या जवळच्या मित्रमंडळींशी बोलायला.. भले नका प्रत्यक्ष भेटू, पण ज्यांच्यासोबत आयुष्याची सोनेरी स्वप्नं पाहिली, रंगवली त्या आपल्या सहकाºयांशी, मित्रांशी निदान सुरुवातीला फोनवर तर बोलता येईल की नाही?
पहा एकदा बोलून. काढा त्या जुन्या खोल आठवणी. मनाच्या गाभाºयात खोल रुतून बसलेलं तुमचं तारुण्य पुन्हा फसफसून बाहेर येतं की नाही ते बघा..
मनावर साचलेली सारी जळमटं झडून जाऊ द्या. करा आपल्या मनासारखं. आपल्याला जे आवडतं ते.. काढा ती आपली जुनी विटीदांडू. मांडा तो पत्त्यांचा डाव पुन्हा एकदा.. उडू द्या आपले पतंग आकाशात.. जमवा ती गॅँग पुन्हा एकदा.. आणि हसीमजाक करता करता दणाणून जाऊ द्या पुन्हा एकदा आसमंत..
किमान दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतंय की नाही बघा..