व्हॉट्सॲपवरचा डीपी आणि झाला काडीमोड
By मनीषा म्हात्रे | Published: December 18, 2023 09:12 AM2023-12-18T09:12:55+5:302023-12-18T09:13:31+5:30
एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या डिस्प्ले पिक्चरवर आपल्या जोडीदाराचा डीपी ठेवला नाही म्हणूनही वाद होत आहे. पोलिस अशा जोडप्यांचे चातुर्याने समुपदेशन करतात.
- मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी
दोघेही उच्चशिक्षित. नवविवाहित. हसता खेळता संसार सुरू असतानाच, व्हॉट्सॲपला जोडीदाराचा फोटो डीपी म्हणून ठेवला नाही, म्हणून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. वाद पोलिस ठाण्यात पोहोचला. थेट दोघांनीही घटस्फोटाचा पर्याय निवडला; मात्र मुंबई पोलिसांमुळे त्यांचा संसार वाचला. त्यांच्यासारखी अनेक जोडपे क्षुल्लक वादातून थेट पोलिस ठाण्याची पायरी चढत आहेत. याच दोघांमध्ये प्रेमाचा धागा बनून मुंबई पोलिस त्यांचे नाते पुन्हा फुलवताना दिसत आहेत.
मुंबई पोलिसांच्या महिला अत्याचार विरोधी कक्षातील समुपदेशन कक्ष ही महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावत आहे. जानेवारीपासून समुपदेशन कक्षाला पती-पत्नीमधील वादांशी संबंधित ३८६ हून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५४ प्रकरणांमध्ये यशस्वीपणे मध्यस्थी करत दुरावलेले नाते पुन्हा एकत्र आणण्यास पथकाला यश आले. पीडित महिलांना न्याय देण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली दशकभरापूर्वी महिला अत्याचार विरोधी सेलची स्थापना केली होती. यामध्ये जवळपास ४२ महिला पोलिस उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. सध्याचा काळ बदलला आहे. पूर्वीच्या गंभीर कारणांपैकी, आजची वादाची कारणे वेगळी आहेत.
एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या डिस्प्ले पिक्चरवर आपल्या जोडीदाराचा डीपी ठेवला नाही म्हणूनही वाद होत आहे. पोलिस अशा जोडप्यांचे चातुर्याने समुपदेशन करतात.
महिलांसंबंधित नोंदवलेल्या केसेस हाताळणे आणि त्यावर लक्ष ठेवण्याशिवाय, आम्ही आमच्या समुपदेशन केंद्रांद्वारे समुपदेशन करणे हे एक महत्त्वाचे काम करतो, असे या युनिटच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अपर्णा जोशी यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा, एखाद्या जोडप्यामध्ये वाद होतात आणि ते पती-पत्नी किंवा सासरच्या लोकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यासाठी शहरातील ९६ पैकी कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये जातात, तेव्हा प्रथम स्थानिक पोलिस स्टेशनच्या स्तरावर त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना पुढील समुपदेशन करण्यास वाव आहे असे वाटत असल्यास, त्यांना क्रॉफर्ड मार्केट पोलिस मुख्यालयातील समुपदेशन केंद्रात किंवा लोअर परळमधील एन. एम. जोशी मार्ग स्टेशनजवळील केंद्रात पाठवले जाते.
काही प्रकरणांमध्ये वंध्यत्वामुळे दोघांमध्ये भांडणे होत होती. आम्ही त्यांना आयव्हीएफ केंद्रांमध्ये मार्गदर्शन केले आणि आता त्यांना मुले आहेत आणि ते आनंदी आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसतानाही, आमच्या पुरुष आणि महिला हवालदारांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. आता इतर पोलिस युनिट्सनाही समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अपर्णा जोशी यांनी नमूद केले.