..तू कुणाला वाचवशील?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:48 AM2018-04-12T09:48:41+5:302018-04-12T09:48:41+5:30

समीर आणि नीलिमाची दोस्ती. पण, फार कमी वेळात समीरला मुक्ता आवडायला लागली आणि तिलाही तो.. पण मग नीलिमा, तिची दोस्ती? मुक्ता आणि तिची ओढ, यापैकी समीर नक्की काय निवडणार होता?

..who will save someone? | ..तू कुणाला वाचवशील?

..तू कुणाला वाचवशील?

Next

- श्रुती मधुदीप
 

1. आज कितीतरी दिवसांनी कॉलेजचा ग्रुप एकत्र भेटलाय हे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती लख्ख हसू होतं. ग्रुपमधले अगदी सगळेजण एकाचवेळी नेम साधून कॉलेजमध्ये कसे काय भेटले याचं सगळ्यांना आज आश्चर्यच वाटत होतं. सकाळपासून सगळे अगदी मजा-मस्तीच्या मूडमध्ये होते. आणि मग सतीशने त्याला त्याच्या क्लासमध्ये आवडलेल्या एका मुलीबद्दल सांगायला सुरुवात केली.
‘ मला नव्हतं वाटलं रे, मला एखादी मुलगी अशी इतकी आवडू शकते. म्हणजे अरे इतकी साधी आहे ना ती आणि खूप सुंदर’
आम्ही सगळे त्याच्या एक्स्प्रेशनकडे बघून त्याला चिडवत होतो.
‘म्हणजे नेमकी कशी आहे रे ती’- नीलिमानं सतीशला विचारलं.
‘ ती ना फक्त मुलगी म्हणून सुंदर आहे असं नाही’ -सतीश म्हणाला.
आणि मग सगळे ओरडले ‘मगऽऽऽ?’
‘अरे म्हणजे मुलगी म्हणून ती सुंदर आहेच; पण ती जे वागते-बोलते ना लोकांशी त्यातून ती आणखीनच सुंदर वाटते. विरघळून जावंसं वाटतं तिच्यात. म्हणजे कसं सांगू..’ सतीश पुढे बोलत राहिला.
सतीशचं हे बोलणं समीरला मुक्ताच्या जवळ घेऊन गेलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. मुक्तापण त्याच्याकडेच बघत होती. दोघं एकमेकांकडे पाहून ओळखीचं हसले. मुक्तानं हलकं च तिचं डोकं त्याच्या खांद्यावर अलगद ठेवलं. समीरनं कुणालाही कळणार नाही, इतक्या चलाखीनं तिच्या केसांवर हात फिरवला आणि पुन्हा त्या दोघांनी सतीशच्या बोलण्याकडे लक्ष वळवलं.
सतीशचे डोळे आवडलेल्या मुलीविषयी सांगता सांगता पाणावले होते.
इतक्यात नीलिमानं समीर आणि मुक्ताकडे नाराजीची नजर टाकली. त्या नजरेनं समीर एकदम ओशाळलाच. मुक्तानं आपलं डोकं समीरच्या खांद्यावरून बाजूला सारलं. आणि मग नीलिमा लहान मुलीसारखी समीरच्या जवळ गेली. खरं तर, नीलिमा त्याची चांगली मैत्रीण होती. सगळ्यात जास्त वेळ त्यानं तिच्यासोबतच तर घालवला होता कॉलेजमध्ये आल्यापासून. अकरावीपासून त्यांची दोस्ती होती. मुलगी म्हणून नीलिमा त्याला आवडीलीही होती. मिलिटरी स्कूलमध्ये शिकल्यामुळं मुलींच्या अजिबात संपर्कात नसलेल्या समीरची पहिली छान मैत्रीण नीलिमा झाली होती. आपण एका सुंदर मुलीसोबत बराच वेळ असतो, फिरतो हे फिलिंग त्याला भारी वाटायचं. काही काळ, पण, यावर्षीच भेटलेल्या मुक्तासोबत कमी वेळ घालवूनही तिच्याविषयी न मांडता येणारी ओढ तो कशी सांगू शकणार होता कुणालाही! नीलिमासोबत घालवलेल्या वेळेपेक्षा फार न बोलताही मुक्तासोबत आपला वाटणारा बंध तो कसा व्यक्त करू शकणार होता? आपलं असणं हे मुक्ताच्या जवळ जाणारं आहे, हे त्याला कळू लागलं होतं. फक्त विरुद्धलिंगाच्या व्यक्तीची आपल्याला गरज नाहीय, तर त्यापल्याड मुक्ताबद्दल जे ‘आपलं’ वाटतं ते वाटणं हवं होतं. पण, तो हे सगळं कुठं बोलणार होता! तो त्याच्या आसमंताच्या शोधात होता!

2. आदित्यनं विचारलं, समजा तुम्ही एका बोटमध्ये आहात. कुठल्यातरी लांबच्या प्रवासाला निघाला आहात. त्या बोटीमध्ये आपण सगळे आहोत. आणि अचानक पूर येतो. आता तुम्ही फक्त एकाच माणसाला वाचवू शकता. कुणाला वाचवाल..? आणि हो या प्रश्नाचं उत्तर नीट द्यायचं हं. चल, सांग सतीश!
सतीश : अं.. मी तुला वाचवीन आदित्य!
नीलिमाकडे टर्न आला.
नीलिमा : आॅफकोर्स समीरला!
तो पुन्हा ओशाळला. प्रत्येक आॅफ तासाला नीलिमासोबत घालवलेला वेळ त्याला प्रेशराइझ करत होता. नीलिमासोबत बराच वेळ घालवला असला तरी काहीतरी मिसिंग होतं त्या नात्यात असं त्याला वाटतं होतं. मन म्हणत होतं ‘मला मुक्ता आवडते’ पण.ण्
आदित्य : आता सम्या सांग रे.
असं म्हणून आदित्य त्याच्याकडे वळला.
समीर : अं माहीत नाही.
नीलिमा आपल्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहातेय हे त्याला कळत होतं. पण, तिच्याकडे पाहायची त्याची हिंमत होत नव्हती.
आदित्य : मी आधीच सांगितलंय सरळ उत्तर द्यायचंय.
तो : अंऽऽ मी मुक्ताला आणि..
त्या ‘आणि’ नंतर कुणाला काही ऐकू आलं की नाही कळलंच नाही. नीलिमा समीरच्या या उत्तरानं आतून हाललीच. इतका वेळ मी आणि समीर सोबत राहात असून, इतका वेळ एकमेकांसोबत घालवत असूनही ‘तिचं’ नाव पहिलं न येणं तिला दुखावून गेलं.
इतक्यात मुक्तावर टर्न आला. ती क्षणाचाही विलंब न करता म्हणाली,
मुक्ता : जी व्यक्ती जवळ असेल, माझ्या हाताला लागेल तिला.
या तिच्या उत्तरानं समीरनं पुन्हा एकदा मुक्ताकडे चमकून पाहिलं.

3. निघायची वेळ झाली होती. रोज नीलिमाच्या गाडीवर घरी जाणाºया समीरला मुक्तासोबत बोलत बोलत घरी जायची इच्छा होती. किती दिवसांचं बोलणं बाकी होतं मुक्ताशी. मुक्ता गेले पंधरा दिवस गावाला गेली होती त्यामुळं समीर मुक्ताशी बोलणं मिस करत होता; पण नीलिमाला तो काय सांगणार होता?
नीलू , तू आजच्या दिवस पुढे होतेस? मी मुक्तासोबत येतो आज. - समीर गडबडून बोलला.
नीलिमा काहीही न बोलता अचानक ताडकन भराभर चालत जाऊन पार्किंगमध्ये गेली. त्याला काय करावं सुचेना. तो तिच्या पाठोपाठ लगबगीनं गेला. तिला हाक मारत राहिला; पण नीलिमा मात्र काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती.
‘ऐक ना नीलू.. अगं सॉरी’ - समीर
‘अरे ठिके. जा तू. मी कुठं काय म्हटलं?’
नीलिमाचे डोळे पाणावले. समीरने तिला मिठी मारली. समीरची मिठी नीलूला सांगत होती, ‘तुझ्यासोबत प्रवास करायचंय मला; पण मुक्ता वेगळ्या तीव्रतेनं माझी वाटते.’ नीलूने तिची गाडी सुरू केली होती.
मुक्ता समीर परतून येईल या आशेत तळमळत होती.
आणि तो दोघींकडे गोंधळलेल्या नजरेनं पाहात होता. त्याला परतायचं होतं मुक्ताकडे; पण नीलूची गाडी रेस होत होती. तो काय करणार होता आता, कुणास ठाऊक?
 dancershrutu@gmail.com 

Web Title: ..who will save someone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.