मुलांच्या ‘कुतुहला’चा कोंडमारा कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:28 PM2017-09-11T14:28:25+5:302017-09-11T14:33:17+5:30
शाळा, पालक आणि शिक्षक याबाबत बरंच काही करू शकतात..
- मयूर पठाडे
लैंगिक शिक्षणाबाबत मुलांना सजग करण्याची जबाबदारी प्रत्येकाची हे तर खरंच, पण आजकाल कोण, त्याबाबत स्वत:हून पुढाकार घेताना दिसतंय? त्याविषयी जरा काही बोललं तरी अनेकांच्या भुवया वर होतात, अशावेळी मुलांना योग्य तºहेनं लैंगिक शिक्षण मिळणार तरी कसं?
समाजातील काही घटक, अभ्यासक, शिक्षणतज्ञ याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करताहेत, सरकारदरबारी आपले उंबरठे झिजवताहेत, मुलांच्या जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात यासाठी प्रयत्न करताहेत, जुन्या संकल्पना कशा चुकीच्या आहेत, याकडे सरकार आणि समाजाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताहेत, पण हे प्रयत्न किती तोकडे आहेत हे तर दिसतंच आहे.
अशावेळी पालकांनीच याबाबत पुढाकार घेऊन योग्य वयात, योग्य गोष्टी, योग्य पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काही प्राथमिक गोष्टी तरी त्यांना करता येतील.
काय करता येईल?
१- संवेदनक्षम वयातील मुलांना प्रत्येक गोष्टीचं कुतुहल असतं. त्यांचं हे कुतुहल समाजमान्य, योग्य पद्धतीनं नाही शमलं तर मग ते मिळेल त्या मार्गानं हे कुतुहल शमवण्याचा प्रयत्न करतात. लैंगिक शिक्षणाबाबतही हे खरं आहे. त्यामुळे याबाबत मुलांना पडणारे प्रश्न शास्त्रीय पद्धतीनंच सोडवले पाहिजेत. त्यासाठी पालकांनी दक्ष राहायला हवं. प्रश्न सोडून देण्याऐवजी त्याचं योग्य उत्तर मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
२- योग्य माहिती योग्य त्या वयात मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी शाळा, पालक आणि अभ्यासक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. शाळा याविषयी संवेदनशील असेल, तर यासंदर्भातील तज्ञांचे अभ्यासवर्ग घेऊन मुलांना हसतखेळत आपल्या शरीराची ओळख करुन देता येऊ शकते. काही शाळा ते करीत आहेत.
३- मुलांच्या सर्वांगीण वाढीत शाळांचा हातभार खूप मोठा असतो हे खरं, शाळा त्याबाबत खूप काही करू शकतात, पण त्यासाठी प्रत्येक वेळी शाळेवरच अवलंबून राहाणंही चुकीचं आहे. मुलांच्या लैंगिक शिक्षणाबाबत शाळा काही करीत नसेल, तर शेवटी ती जबाबदारी पालकांवरच येते. सजग पालकांचा गट एकत्र येऊनही याबाबत विधायक गोष्टी करता येऊ शकतात.
४- मुलांच्या भावभावनांचा लंबकही याकाळात चांगलाच हेलकावे घेत असतो. एका मोठ्या शारीरिक, मानसिक बदलातून मुलं जात असतात. त्यांच्या भावनांना योग्य आणि विधायक दिशा देण्याचं काम पालकांना करावं लागतं. मुलांचं चालणं, वागणं, बोलणं, आचरण.. यांच्याकडे सजग दृष्टीनं पाहून मुलांनाही त्याकडे सकारात्मकरित्या पाहाण्याची सवय लावणं गरजेचं असतं.
५- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लैंगिक शिक्षणासारख्या नाजूक, पण महत्त्वाच्या गोष्टीबाबत पालकांचा दृष्टिकोन कसा आहे, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. पालकांनाच त्याचं महत्त्व वाटत नसेल, त्याबाबत ते उदासिन, टोकाचे विचार असलेले किंवा ही जबाबदारी आपली नाही असं ते मानत असतील, तर अशा पालकांच्या मुलांचा मात्र अधिकच कोंडमारा होतो. त्यासाठी या विषयाचं महत्त्व आणि मुलांशी या विषयावर बोलण्याचं कौशल्य पालकांनी स्वत:च आत्मसात करून घ्यायला हवं.