का वाटतो मुलांना एकटेपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 05:52 PM2017-09-13T17:52:20+5:302017-09-13T17:55:31+5:30

बोला मुलांशी. अनेक गोष्टी तुम्हाला समजून येतील..

Why do children see loneliness? | का वाटतो मुलांना एकटेपणा?

का वाटतो मुलांना एकटेपणा?

Next
ठळक मुद्देमुलांना एकवेळ सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या, तरी चालतील, पण त्यांच्याशी संवाद, त्यांच्या जगात काय चाललं आहे, हे पालकांनी त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे.आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येताहेत का हे जाणून घेतलं पाहिजे. अशा गोष्टी मुलांशी बोलल्या गेल्या म्हणजे त्यांच्या मनात जर खरोखरच आत्महत्येचे विचार येत असतील तर ते त्यापासून दूर होतील, मोकळे होतील.आपली मुलं जर एकटी राहात असतील, कारणं काहीही असोत, पण त्यांना जर त्याची सवय लागली असेल, तर ती सोशल कशी होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे.

- मयूर पठाडे

आनंदी असणं, राहाणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं सजगही राहायला हवं. आपली मुलंही आनंदी असावीत, त्यांच्यामागे टेन्शनचा भुंगा नको, असं आपल्याला कितीही वाटत असलं, तरी आपणही त्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे..
आजच्या फास्ट जगात प्रत्येकाचीच मुलांकडून इतकी काही अपेक्षा आहे की त्यासाठी मुलांना धावाधाव करावीच लागते. या चक्रात गुरफटल्यानंतर त्यातून वेळीच बाहेर पडता नाही आलं किंवा त्याला तोंड देता नाही आलं तर मुलांना नैराश्य येतं आणि त्यात मग ते होरपळून निघतात.
आजकाल मुलंही खूप टेन्शनमध्ये दिसतात. त्यामागे अनेक कारणं आहेतच, पण त्या कारणांचा निचराही करता येऊ शकतो. पालकांनी याबाबत दक्ष राहाणं गरजेचं आहे.

काय करता येईल?
१- मुलांशी पालकांचा संवाद असलाच पाहिजे. प्रत्येक टप्प्यावर पालकांनी मुलांशी अर्थपूर्ण संवाद केला पाहिजे. मुलांना सगळं काही घेऊन दिलं, त्यांना पाहिजे तिथे अ‍ॅडमिशन मिळाली, ती शाळा, कॉलेजात जाताहेत, म्हणजे सारं काही आलबेल आहे, आणि आपली जबाबदारी संपली असं नाही. मुलांना एकवेळ सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या, तरी चालतील, पण त्यांच्याशी संवाद, त्यांच्या जगात काय चाललं आहे, हे पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे.
२- आणखी एक आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांशी सुसायडल टेन्डन्सीबद्दल बोललंही पाहिजे. आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येताहेत का हे जाणून घेतलं पाहिजे. अनेकांना वाटतं, मुलांशी आत्महत्येसारख्या गोष्टींवर बोलणं म्हणजे त्यांना स्वत:हून त्या गोष्टीची ‘आयडिया’, जाणीव करुन देणं. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, उलट अशा गोष्टी मुलांशी बोलल्या गेल्या म्हणजे त्यांच्या मनात जर खरोखरच आत्महत्येचे विचार येत असतील तर ते त्यापासून दूर होतील, मोकळे होतील.
३- मुलांचा एकटेपणा घालवायला हवा. आपली मुलं जर एकटी राहात असतील, कारणं काहीही असोत, पण त्यांना जर त्याची सवय लागली असेल, तर ती सोशल कशी होतील, याकडे लक्ष दिलं पाहिज. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. मुलं बाहेर जातील, मित्रमंडळीत रमतील यासाठी तसं वातावरण निर्माण करायला हवं.
४- अभ्यासकांचं म्हणणं आहे, नैराश्य येण्याचं वय हळूहळू खूपच खाली येत चाललंय आणि अगदी बारा वर्षाच्या आतील मुलंही आता आत्महत्या करू लागलीत. त्याचंही प्रमाण बरंच मोठं आहे. त्यामुळे आपल्या मुलाला नैराश्य येऊच शकत नाही, या गैरसमजातून आपण बाहेर यायला हवं.

Web Title: Why do children see loneliness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.