तुमचं मूल असं दु:खी का दिसतंय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 05:45 PM2017-09-13T17:45:43+5:302017-09-13T17:50:42+5:30
त्याला डिप्रेशनही आलेलं असू शकतं..
- मयूर पठाडे
मुलांकडे पाहिल्यावर आपल्यालाही कसं प्रसन्न वाटतं. दिवसभराचा आपला थकवा, टेन्शन कुठल्याकुठे पळून जातो आणि पुन्हा नव्या आव्हानांसाठी आपण सज्ज होतो.. पण मुलांचं काय? हल्ली मुलं दिसतात प्रसन्न, उत्साही? लहान मुलांना कसलं आलंय टेन्शन असं आपल्याला वाटतं, पण जगभरातले विविध अभ्यास सांगतात, मुलांनाही खूप टेन्शन असतं. अनेक कारणांनी त्यांचं बालपण हिरावलं जातंय.. आजकाल लहान मुलंच नाहीत, तरुणांमध्येही हे डिप्रेशन मोठ्या प्रमाणावर सध्या दिसतंय.
का होतंय असं? काय करायचं त्यासाठी? मुलं आनंदी असली तर त्याचा त्यांच्या आयुष्यावरच सकारात्मक परिणाम होतो आणि अख्खं घरच त्यामुळे आनंदी होतं, पण त्यासाठी पालक म्हणून थोडे प्रयत्न करायची गरज आहे.
मुलं डिप्रेस्ड असली, तर काय कराल?
१- सर्वसामान्य आजारांप्रमाणे मुळात डिप्रेशन हादेखील एक आजार आहे, हे आपण मान्य करायला हवं. अनेक पालकांना वाटतं, या वयातील मुलांना डिप्रेशनचा आजार होऊच शकत नाही. त्यामुळे एकतर ते त्याकडे दुर्लक्ष करतात, किंवा त्या मुलावरच राग काढतात. आजाराची शंका आधी दूर केली पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांकडून मुलाची तपासणीही करून घ्यायला हवी.
२- मुलाला जर खरंच डिप्रेशनचा आजार झाला असेल, आधी त्यासाठी त्याला चांगला डॉक्टर आणि सर्पोटिव्ह पॅरेंट मिळणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी पालक म्हणून आपल्याच हातात आहेत. याच काळात मुलांना पालकांच्या पठिंब्याची सर्वाधिक गरज असते. त्यांची ही गरज अत्यंत जबाबदारीनं आपण निभवायला हवी.
३- त्यासाठी थोडा होमवर्कही हवा. म्हणजे डिप्रेशन का येतं, त्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय, परिणाम काय आणि त्यावरचे उपाय काय.. सारखी माहिती पालकांनी मिळवली पाहिजे आणि त्यासाठी तसं वाचन करणं, तज्ञांकडून, अभ्यासकांकडून, परिचितांकडून माहिती मिळवणं आवश्यक ठरतं. कारण त्यामुळे आपल्याला काय करायला हवं याबद्दलची पालकांची मानसिकताही त्यामुळे तयार होते. मुलांच्या भवितव्यासाठी त्याचा उपयोग होतो.
४- आपल्या मुलाला डिप्रेशनचा आजार झालेला असू शकतो, हे पालकांनी जसं लक्षात घेणं गरजेचं आहे, तसंच डिप्रेशन येणं म्हणजे खूप वाईट आहे, ते जगावेगळं आहे असं मुलांना वाटत असेल तर त्याबाबतचा त्यांचा गैरसमजही आपण दूर केला पाहिजे. मुलांच्या पाठीशी उभं राहाताना त्यांना तसा विश्वास आपण द्यायला हवा.
मुलांना पुन्हा हसरंखेळतं पाहायचं असेल तर या गोष्टी आपल्याला करायलाच हव्यात. आणखी काही गोष्टी पाहू या पुढील भागात..