पतीलाच ५००० पोटगी देणार पत्नी; कौटुंबिक न्यायालयाचा महत्वाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:12 AM2024-02-23T11:12:45+5:302024-02-23T11:13:09+5:30
पती बेरोजगार असल्याने त्याच्या भरण-पोषणासाठी दर महिन्याला ५००० रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
करोडपती असेल किंवा लाखोंत कमावती असेल आजपर्यंत पती पत्नीला पोटगी देतो असे ऐकले असेल. परंतु आता पत्नी पतीला पोटगी देणार आहे. कौटुंबिक न्यायालयाने एका घटस्फोटाच्या खटल्यात ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या एका महिलेला पतीलाच दर महिन्याला पाच हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
पती बेरोजगार असल्याने त्याच्या भरण-पोषणासाठी दर महिन्याला ५००० रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पतीचे वकील मनीष झारोला यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. इंदौरचे हे प्रकरण आहे. पोटगीसोबतच खटल्यासाठी आलेला खर्चही देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
महिला ही ब्यूटी पार्लर चालविते. तिने दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे १२ वी नंतर पती त्याचे शिक्षण पूर्ण करू शकला नाही. यामुळे सध्या तो बेरोजगार असल्याचे कोर्टाला सांगितले गेले. तसेच स्वत:चा खर्च उचलण्यास असमर्थ आहे, असे सांगितले गेले. सर्व पुरावे पाहून कोर्टाने पत्नीलाच पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
२०२२ मध्ये महिलेने त्याला धमक्या देऊन आर्य समाज मंदिरात लग्न करण्यास भाग पाडले होते. तो लग्नासाठी तयार नव्हता. यामुळे या तरुणाने इंदौर पोलीस आयुक्तांकडे तक्रारही दिलेली होती. याचा बदला घेण्यासाठी व या तरुणासोबत विवाहसंबंध आहेत हे सिद्ध करण्यासाठी महिला कौटुंबिक न्यायालयात गेली होती. परंतु, तिलाच न्यायालयाने जोरदार फटकारले आहे.