महिलांचे अश्रू पाहिले की पुरुषांमधील आक्रमकता होते कमी; इस्रालयमधील नव्या संशोधनाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:57 AM2023-12-23T05:57:49+5:302023-12-23T05:57:57+5:30
रासायनिक घटकांतून एक विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण हाेताे आणि त्यामुळे पुरुषांची आक्रमक भावना कमी हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले की पुरुषांचा राग निवळतो असे म्हणण्याची पद्धत होती. तसे वर्णन विविध कथा, कादंबऱ्यांमध्येही आढळते. पण आता त्याला इस्रायलमध्ये झालेल्या नव्या संशोधनामुळे शास्त्रीय आधार मिळाला आहे.
या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे की, महिलांच्या अश्रूंमध्ये असे रासायनिक घटक असतात, ज्यामुळे पुरुषांमधील आक्रमकता कमी होते. परिणामी त्यांना आलेला रागही निवळतो. या रासायनिक घटकांतून एक विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण हाेताे आणि त्यामुळे पुरुषांची आक्रमक भावना कमी हाेते.
खऱ्या अन् खाेट्या अश्रुंचा वापर
nसंशोधनासाठी केलेल्या प्रयोगात पुरुषांच्या एका गटाला डोळ्यांत अश्रू आलेल्या महिलांसमोर नेण्यात आले. समोरच्या महिलेने आपली फसवणूक केल्याची भावना या पुरुषांच्या मनात निर्माण केली होती.
nपण महिलांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून त्या पुरुषांतील आक्रमकता कमी झाली व ते काहीसे शांत झाले.
nप्रयोगात सामील झालेल्या महिलांच्या डोळ्यांत कधी खरे अश्रू होते तर कधी अश्रू येण्यासाठी सलाइनचा वापर करण्यात आला होता.
अश्रुंचा गंध पाडताे पुरुषाच्या आक्रमकतेवर प्रभाव
nप्राण्यांमध्ये मादीच्या डोळ्यांत अश्रू आल्यास नराची आक्रमकता, राग कमी होणे ही सर्वसामान्य बाब आहे. उंदरांमध्ये नराला मादीच्या अश्रूंचा गंध आल्यानंतर त्याची आक्रमकता कमी होते.
nमात्र माणसामध्ये अशी प्रक्रिया होते का याबद्दल आजवर सखोल संशोधन झाले नव्हते. यासंदर्भात वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने केलेल्या संशोधनावर आधारित लेख प्लोस बायोलाॅजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
प्रयोगांतील अश्रू होते खरे व सलाइनचेही
समोरच्या महिलेने फसवणूक केल्यामुळे आपण पैसे गमावले आहेत अशी धारणा करून दिलेल्या पुरुषाला त्या महिलेच्या डोळ्यांतील अश्रू खरे की सलाइन द्रवाचे आहेत याची जाणीव नव्हती.
महिलांचे अश्रू पाहिल्यानंतर पुरुषांमधील आक्रमकता ४० टक्क्यांनी कमी झाली. हे होत असताना पुरुषांच्या मेंदूतील क्रियांचा एमआरआयद्वारे अभ्यास करण्यात आला होता.
महिलांच्या अश्रूंमधील रासायनिक घटकांमुळे पुरुषांचा राग कमी होतो या संशोधनाचा अधिक फायदा महिला की पुरुषांना होणार याची चर्चा आता रंगण्याची शक्यता आहे.