तरुणींनी धुडकावला ‘हाफ प्लस सेव्हन’ रुल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 09:15 AM2021-10-26T09:15:39+5:302021-10-26T09:16:29+5:30
अमेरिकेतही गेली अनेक वर्षे हाच ट्रेंड दिसत होता. म्हणजे लग्न करताना मुलाचं वय मुलीपेक्षा जास्त असावं. पण किती जास्त? अनेकदा लग्नाळू ‘मुलाचं’ वय, मुलीपेक्षा तब्बल वीस-बावीस वर्षांनी जास्त असायचं!
लग्नात मुलगा आणि मुलगी यांच्या वयात किती अंतर असावं? यात अनेक लोकांमध्ये आणि अनेक देशांप्रमाणे बरीच मतमतांतरे सापडतील. पण, आपल्याकडील बुजूर्ग मंडळींना विचाराल, तर ते आजही नक्कीच सांगतील, मुलापेक्षा मुलगी वयानं चांगली पाच - सात वर्षांनी लहान असावी. कारण काय, तर त्यांचं म्हणणं, बायका पुरुषांपेक्षा लवकर ‘वयस्कर’ होतात, किंवा वयस्कर दिसायला लागतात. त्यामुळे नवरा मुलगा वयानं जास्तच असावा. अर्थात या म्हणण्यात तसा शास्त्रीय अर्थ काहीही नाही. पण, गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही अनेक ठिकाणी चालू आहे. अर्थातच आधुनिक काळानुसार या परंपरेला छेद जाऊ लागला आहे आणि मुला - मुलींच्या वयातील तफावत बऱ्यापैकी कमी होऊ लागली आहे. काही वेळेस तर मुलगी, मुलापेक्षा वयानं जास्त असल्याचंही आजकाल आढळून येतं.
अमेरिकेतही गेली अनेक वर्षे हाच ट्रेंड दिसत होता. म्हणजे लग्न करताना मुलाचं वय मुलीपेक्षा जास्त असावं. पण किती जास्त? अनेकदा लग्नाळू ‘मुलाचं’ वय, मुलीपेक्षा तब्बल वीस-बावीस वर्षांनी जास्त असायचं! प्रेम कुणावरही बसू शकतं, हे कारण त्यासाठी सांगितलं जात असलं, तरीही शास्त्रीयदृष्ट्या हे फारसं योग्य नाही. पण, अमेरिकेसारख्या देशात नवरा - बायकोच्या वयातील हा फरक आजही दिसून येतो. अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीतही ही गोष्ट बऱ्याचदा खरी दिसते. पण, अमेरिकेतही अलीकडे लग्नाळू मुलगा आणि मुलगी यांच्यातील वयाचं अंतर कमी होत आहे. अमेरिकेच्या समाज अभ्यासकांनीही या गोष्टीचं स्वागत केलं आहे.
कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी याबाबतीत नुकतीच एक पाहणी केली. त्यात त्यांच्या लक्षात आलं की, ज्या विवाहात पुरुष आणि स्त्रियांमधील वयाच्या अंतरात जास्त फरक असतो, त्यांना अनेक अडचणी येतात. त्या शारीरिक तर असतातच, पण मानसिक आणि आर्थिकही. वय जास्त असल्यानं ते एकमेकांना रिलेट करू शकत नाहीत. त्यांच्यातील वादाचं प्रमाणही जास्त असतं. आर्थिक अडचणींचे प्रसंग कुटुंबावर येतात, त्यावेळी त्यातून बाहेर पडायलाही या जोडप्यांना जास्त त्रास होतो. आर्थिक संकटांशी ही जोडपी चटकन जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा त्यातून त्यांना लवकर मार्ग शोधता येत नाही. त्या तुलनेत ज्या जोडप्यातील वयाचा फरक कमी असतो, ती जोडपी अनेक प्रसंगांतून सहजपणे बाहेर पडू शकतात, त्याचा फारसा ताणही त्यांच्यावर येत नाही. त्यामुळे वयातील अंतर कमी होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे.
अमेरिकन सेन्सस ब्युरोच्या माहितीनुसार विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन जोडप्यातील वयाचं अंतर खूप जास्त होतं. वयातील हा फरक जवळपास तीस टक्क्यांच्याही पुढे होता. नंतर हा फरक कमी होत गेला. ऐंशीच्या दशकात हा फरक दहा टक्क्यांपर्यंत आला आणि सध्या तर तो केवळ तीन टक्के इतका खाली आला आहे. शिक्षणामध्ये, समुपदेशनामध्ये वाढ आणि महिला मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण झाल्यानं, आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभ्या असल्यानं आपल्याहून अधिक वयाच्या पुरुषांशी लग्न करणं त्यांनी बंद केलं आहे. त्यातील धोके त्यांना आता कळायला लागले आहेत.
अर्थतज्ज्ञ आणि या अभ्यासाचे लेखक प्रो. टेरा मॅकिनिश यांचं म्हणणं आहे, ज्या जोडप्यांच्या वयातील अंतर प्रमाणापेक्षा जास्त असतं, आहे, त्यांना समाजाकडूनही मान्यता मिळत नाही. त्यांना लवकर स्वीकारलं जात नाही किंवा अशा जोडप्यांकडे सन्मानानं बघितलं जात नाही. त्यामुळे त्यांनाही नेहमी भेदभावाला आणि सततच्या तुलनेला सामोरं जावं लागतं. त्या तुलनेत ज्यांच्या वयातील अंतर कमी आहे किंवा तुलनेनं सारखं आहे, त्यांना आजकाल समाजही लवकर स्वीकारतो. कारण अडचणीच्या प्रसंगी त्यांच्यातील सामंजस्याचं प्रमाण चांगलं असतं. एकमेकांशी विचारविनिमय करून ते त्यातून चांगला आणि दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काढू शकतात. सुखी संसाराच्या दृष्टीनं ही खूप चांगली गोष्ट आहे, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे. विवाहातील ‘जेंडर गॅप’ कमी होऊन त्यांच्यातील ताणतणावही कमी होतील, असं या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो.
नवरा ३०, तर बायको २२ वर्षांची असावी!
पुरुषांनी कमावून आणावं आणि बायकांनी घर सांभाळावं, या जगभरातील प्रचलित रिवाजानुसार पूर्वी विवाहित जोडप्यातील अंतर जास्त होतं. अर्थात हा ‘रिवाज’ही पुरुषांनी स्वत:च्या सोयीनुसार तयार केला होता. त्यावेळी आणखी एक ‘नियम’ समाजात रुढ होता, तो म्हणजे ‘हाफ प्लस सेव्हन’ रुल! म्हणजे समजा, नवरा मुलगा जर तीस वर्षांचा असेल, तर नवरी मुलगी त्याच्या वयाच्या निम्म्यापेक्षा सात वर्षांनी मोठी असावी. याचाच अर्थ मुलगा तीस वर्षांचा असेल तर मुलगी (१५ अधिक ७) म्हणजे २२ वर्षांची असावी! गेल्या साधारण २०-२५ वर्षांपूर्वी महिलांनी हा ‘नियम’ उलथवून लावायला सुरुवात केली!