तुमचं मूल अचानक तऱ्हेवाईक वागतं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:00 PM2017-09-11T13:00:03+5:302017-09-11T13:02:31+5:30
मुलांचे मूड सातत्यानं स्विंग होत असतील तर या गोष्टी कराच..
- मयूर पठाडे
मुलांच्या मूडविषयी काय सांगावं? कधी एकदम आनंदात, काय करू आणि काय नको, असं त्यांना झालेलं असतं, तर थोड्याच वेळात मूड असा की एकदम एरंडेल तेल प्याल्यासारखा. घुम्म बसून राहतील.. कधी इतका आक्रस्ताळेपणा की एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. अगदी त्या क्षणाला. ती नाही मिळाली, तर मग आरडाओरडा, रडबोंबल, वस्तूंची फेकाफेक.. अगदी मारामारी करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत.
का होतं असं? मुलांचे मूड इतके स्विंग का होतात? का इतक्या झपाट्यानं त्यांचे रंग बदलतात? त्यासाठी काय करायला हवं?
काही सोप्या युक्त्या आहेत.
पाहा करून. पालक म्हणून या गोष्टी आपल्याला सातत्यानं कराव्या लागतील.
मुलांच्या बदलत्या मूडसाठी काय कराल?
१- मुलं अचानक दु:खी मूडमध्ये जातात, कुठे कोपºयात जाऊन बसतात, कोणाशी बोलत नाहीत, काही नाही.. अशावेळी त्यांच्यावर आराडाओरड करण्यापेक्षा शांतपणे त्यांच्याजवळ बसा. त्यांच्याशी बोला. त्यांना रिलॅक्स, आश्वस्त करा आणि त्यांचं म्हणणं समजून घ्या. मुलांचा मूड नक्कीच बदलेल.
२- काही वेळा मुलं ओव्हरसेन्सिटिव्ह होतात. लहानसहान गोष्टींनी एकदम भावूक होतात. काही मुलं तर काही ‘कारण नसताना’ अचानक रडायला लागतात, आपल्याला वाटतं, आत्ता तर चांगला होता, अचानक असं काय करायला लागला?.. आपणही मग चिडतो. रागावतो. पण अशावेळी त्याला व्यक्त होऊ नका. सल्ला देण्याच्या भानगडीत तर जराही पडू नका. तो शांत झाल्यावर त्याला विचारा. कुठे काही चुकलं असेल तर गोडीतच आणि समजावून सांगा.
३- आजकाल अनेक मुलं आपण पाहतो, त्यांना हवं ते त्याक्षणी त्यांना पाहिजे असतं. नाही मिळालं तर त्यावेळी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. अशा मुलांशी संवाद साधताना जरा जास्त काळजी घ्यावी लागते. घरातही आपण अशाच प्रकारे रिअॅक्ट होतो का, याचा विचार आधी करायला हवा. तसं जर आपण करीत असू, तर ही सवय आपल्याला पहिल्यांदा बदलायला हवी. मुलांना योग्य तºहेनं आणि साधकबाधक पद्धतीनं विचार करायला शिकवावं लागतं. उशीर लागतो, पण मुलं नक्की शिकतात.
४- काही मुलं प्रत्येक वेळी कुठली ना कुठली कारणं पुढे करतात. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं कारण तयार असतं. अभ्यास ना बोअरिंगच आहे, आमचे टिचर ना, त्यांना तर काही शिकवताच येत नाही.. अशा वेळी त्यांना चुकीचं ठरवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, त्यांच्याशी शाब्दिक वाद घालत बसण्यापेक्षा त्या त्या विषययात, अभ्यासात मुलांची गोडी कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला हवं. एकदा का अशी गोडी लागली, की मग मुलांची कारणंही बंद होतात.
मुलांचे मूड स्विंग होत असतील, तर त्यासाठी पालक म्हणून आपल्यालाही थोडा पेशन्स ठेवावा लागतो. तो ठेवा. मुलांना समजून घ्या. तेही आपल्याला समजून घेतील. शिकतील..