तुमच्या मुलांना स्वत:विषयी आदर वाटतो?..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:41 PM2017-09-29T17:41:28+5:302017-09-29T17:43:12+5:30
स्वयंपूर्णतेची ही पहिली पायरी आहे..
- मयूर पठाडे
मुलं.. सारीच मुलं खरंतर हुशार असतात. कोणाची हुशारी कोणत्या क्षेत्रात, कोणाची कोणत्या.. एवढाच काय तो फरक.. मात्र प्रत्येक मूल हुशार असतं यात काहीच शंका नाही. पण मुलांमधली हुशारी आपण ओळखतो का, त्यांना तशी संधी देतो का, हादेखील मोठा प्रश्न आहे. मुलांमधली गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य संधी दिली, तर त्यांचा स्वत:विषयीचा आदरही खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. मात्र या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे पालक म्हणून आपलं लक्षच नसतं. एकतर त्याकडे आपण दुर्लक्ष तरी करतो किंवा मुलांना स्वत:विषयी आदर वाटेल असं काही आपण करायचं असतं, हेच अनेक पालकांच्या गावी नसतं.. मात्र या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मुलं खºया अर्थानं स्वयंपूर्ण होण्याकडे ती वाटचाल असते.
मुलांचा स्वत:विषयीचा आदर वाढेल यासाठी काय कराल?
१- मुलांना लायक, सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पालकांनी मदत करायला हवी. ही सक्षमताच त्यांच्या मनात स्वत:विषयीचा आदर वाढवेल.
२- मुलांना कायम हिडीसफिडीस करणं जसं चूक, तसंच त्यांचे अति लाड करणं आणि त्यांनी मिळवलेल्या यशापेक्षा त्यांचं जास्त कौतुक करणं, त्यांच्या प्रत्येक साध्याशा कृतीलाही त्यानं खूप मोठं अचिव्ह केलं आहे असं भासवणं हेदेखील चूकच.
३-मुलांना त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार रिस्क घेऊ द्या. त्याकडे लक्षही ठेवा. कॅलक्युलेटेड रिस्क मुलांमधला आत्मविश्वास वाढवेल.
४- मुलांना मदत करणं ठीक, पण प्रत्येकवेळी संकटमोचक म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आव्हानांपासून वंचित करणंही मुलांच्या वाढीसाठी धोकादायक. संकटांचा सामना केल्याशिवाय आणि त्यातून स्वत: बाहेर पडल्याशिवाय त्यांना त्याचं महत्त्व कळणार तरी कसं?..
५- मुलांमधला स्वत:विषयीचा आदर वाढवण्यासाठी आपण स्वतही त्याला आदर दिला पाहिजे.