संतांचे सामाजिक कार्य..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:44 PM2020-10-02T17:44:14+5:302020-10-02T17:45:08+5:30

संतांनी आपल्या आचार-विचारांतून, तत्वज्ञानांतून, अभंग-संकीर्तनातून महाराष्ट्राच्या या शुष्क माळरानावर भक्तीचे नंदनवन फुलविले. जातिभेदाच्या तटभिंती उध्वस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच धर्माने जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले..!

Social work of saints ..! | संतांचे सामाजिक कार्य..!

संतांचे सामाजिक कार्य..!

googlenewsNext

संतांनी आपल्या आचार-विचारांतून, तत्वज्ञानांतून, अभंग-संकीर्तनातून महाराष्ट्राच्या या शुष्क माळरानावर भक्तीचे नंदनवन फुलविले.  जातिभेदाच्या तटभिंती उध्वस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच  धर्माने  जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले..!

महाराष्ट्र हे भाग्यवंत राज्य आहे. ते यासाठी की, या राज्यांत अनेक संत जन्माला आले. समजा, जर आपल्या या देशात संत अवतीर्णच झाले नसते तर  माणूस माणसासारखा वागला असता का..?

आज ही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सदाचार संपन्न आहे. इथे मानवता, बंधुता, दया, सौजन्य, परोपकार या मूल्यांचे आचरण आहे, याला एकमेव कारण इथे जन्माला आलेले 'संत' हेच आहे..!

खरं तर, जीवाला कैवल्य प्राप्त व्हावे, मानवी मनाची सर्वांगीण उन्नती व्हावी, समाजातील अज्ञान, अंधःकार दूर व्हावा, समाज हा सदाचाराला प्रवृत्त व्हावा आणि दुराचारापासून परावृत्त व्हावा, याच कार्यासाठी संत या जगात अवतीर्ण होतात. महाराष्ट्राच्या पवित्र पुण्यभूमीत असेच अनेक अवतीर्ण झाले.

संतांनी आपल्या अभंगांतून, संतसाहित्यातून नुसतीच तत्त्वज्ञानाची शुष्क चर्चा केली नाही तर ते जे तत्वज्ञान सांगत होते तसे स्वतः आधी जगत होते, वागत होते..!

आधी केले मग सांगितले..!

म्हणूनच तर त्यांच्या वाणीत आणि साहित्यात समाज परिवर्तनाचं सामर्थ्य होतं. सत्पुरुषांच्या जीवन चरित्रांनीच देशाचा इतिहास समृद्ध होतो म्हणून तर संतांचे जीवन चरित्र हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अविभाज्य भाग बनला आहे..!

महापुरुष काही आकाशातून पडत नाहीत तर त्यासाठी वैचारिक क्रांती निर्माण व्हावी लागते. महाराष्ट्रातील संतमालिकेत जगद्गुरु तुकोबांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. तुकोबा म्हणजे साक्षात् भागवत धर्माचा कळसच..!

तुकोबांच्या अभंगवाणीमध्ये ज्याप्रमाणे आर्ततेने केलेला हितोपदेश आहे, त्याचप्रमाणे दांभिकतेवर केलेला प्रहारही आहे..! तुकोबांच्या काळात भक्ती क्षेत्रात सोंग-ढोंग, बुवाबाजी, कर्मकांड याला ऊत आलेला होता. खरी भक्ती लोप पावली जात होती. समाज जीवनात असहिष्णुता बळावली होती. अशा परिस्थितीत -

 

बुडते हे जन न देखवे डोळा ।

येतो कळवळा म्हणूनिया ॥

 

या अखंड तळमळीने तुकोबांनी आपले लक्ष समाजाच्या उद्धाराकडे वळविले आणि यासाठीच त्यांनी आपला देह चंदनासारखा झिजविला..!

 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

((लेखक ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी हे युवा कीर्तनकार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी- ८७ ९३ ०३ ०३ ०३.))

Web Title: Social work of saints ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.