सांगलीत गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाखांची फसवणूक; शिरोळ तालुक्यातील तिघांसह पाच जणांवर गुन्हा
By घनशाम नवाथे | Published: April 1, 2024 01:27 PM2024-04-01T13:27:42+5:302024-04-01T13:28:03+5:30
सांगली : फर्ममध्ये पैसे गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगून नऊ गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाख ८३ हजारांची फसवणूक ...
सांगली : फर्ममध्ये पैसे गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगून नऊ गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाख ८३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इन्फिनिटी एसयू व्हेंचर एलएलपी फर्मचे उदयकुमार चौगुले (रा. उमळवाड, ता. शिरोळ), सुहास पाटील (रा. टाकवडे, ता. शिरोळ), श्रीकृष्ण कबाडे (रा. बुबनाळ, ता. शिरोळ), शंकर कोरे, अक्षय गौराज (पूर्ण पत्ता नाही) या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रशांत महेश मोहनानी (वय ३८, रा. पत्रकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पाच जणांची इन्फिनिटी एसयू व्हेंचर एलएलपी या नावाची फर्म आहे. या पाच जणांनी फिर्यादी मोहनानी व इतर आठ जणांना फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवले. त्यावर नऊ जणांचा विश्वास बसला.
मोहनानी यांच्याकडून एक कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये फर्ममध्ये गुंतवणूक करून घेतले. मोहनानी यांच्या गुंतवणूक रकमेवरील मुद्दल व परतावा मिळून ५० लाख रुपये, १३ लाख २६ हजार रुपये व्याज तसेच आयकर स्वरूपात दिलेला एक लाख ३२ हजार ६०० रुपये टीडीएस, अशी ५१ लाख ३६ हजार ४०० रूपये रक्कम ऑनलाइन घेतली होती.
तसेच मोहनानी याची शिल्लक मूळ मुद्दल रक्कम १ कोटी १३ लाख ३८ हजार ६०० रुपये होती. मोहनानी यांची एकूण १ कोटी १३ लाख ३८ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. तसेच पद्मिनी मोहनानी यांची ३० लाख ८० हजार रुपयांची, मच्छिंद्र मारुती खोत (रा. सिद्धेवाडी) यांची ९ लाख ६० हजार दोनशे रुपयांची, प्रकाश सूर्यकांत तवटे (रा. एरंडोली) यांची ७ लाख ६० हजार रुपयांची, बाजीराव अण्णाप्पा शेलार (रा. सोनी) यांची ११ लाख ८९ हजार ५०० रुपयांची, सिद्धू शिवाजी मलमे (रा. सुभाषनगर) यांची ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांची, सुहास बबनराव मोहिते (रा. मांजर्डे) यांची ९ लाख ३ हजार रुपयांची, सुधीर संभाजी जाधव (रा. माळवाडी) यांची ५ लाख रुपयांची, चंद्रकांत गंगाराम नंदेश्वर (रा. गव्हर्नमेंट कॉलनी) यांची ५ लाख ७३ हजार २५० रुपयांची फसवणूक केली आहे.
ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा
मोहनानी यांनी त्यांच्यासह इतर आठ जणांची १ कोटी ९६ लाख ८३ हजार ५० रुपयांची फसवणूक केल्याबद्दल शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण कायद्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.