Sangli: अबब.. १ कोटी लिटर मैलामिश्रित सांडपाणी कृष्णा नदीत; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:25 PM2024-10-11T17:25:09+5:302024-10-11T17:25:32+5:30
..या गावांचे आरोग्य धोक्यात
सांगली : सांडपाणी प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे गेली महिनाभर सांगलीच्या कृष्णा नदीत दररोज १ कोटी लिटर मैलामिश्रित सांडपाणी मिसळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आल्याने धक्का बसला आहे. याप्रकरणी महापालिकेवर मोठी दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
सांगलीच्या ज्योतीरामदादा आखाड्याजवळ महापालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. या स्टेशनपासून पाच पंपाद्वारे संपूर्ण सांगलीच्या दक्षिण भागातील सांडपाणी हनुमाननगरच्या प्रक्रिया प्रकल्पात जाते. प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार संस्थेवर सोपविली गेली आहे, असे भोसले यांनी सांगितले. १५ सप्टेंबरपासून येथील पंप बंद पडले आहेत. त्यामुळे येथील सर्व म्हणजे १ कोटी लिटर मैलामिश्रित सांडपाणी दररोज कृष्णा नदीत मिसळत आहे.
याशिवाय हनुमाननगरच्या प्रकल्पातून शुद्धीकरण झालेले पाणीही भोबे गटारीत सोडण्याचा प्रकारही समोर आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी एस. जे. हरबड यांनी स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल महापालिकेला दिला आहे. पंपिंग स्टेशन कार्यान्वित नसल्याची बाब ठेकेदार किंवा महापालिकेला माहिती नव्हती. त्यामुळे ठेकेदार व या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अभिजित भोसले यांनी केली आहे.
..या गावांचे आरोग्य धोक्यात
सांगलीत कृष्णा नदीत मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे हरीपूर, अंकली, धामणी, बामणी आदी गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली महिनाभर नदीचे प्रदूषण सुरू असताना याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल
नदी प्रदूषणप्रकरणी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला यापूर्वीच ३३ कोटींचा दंड ठोठावला आहे. याशिवाय दररोज १ लाख रुपये दंड सुरूच आहे. अशातच आता नव्याने हरीपूर नाल्यातून होणारे प्रदूषण वाढल्याने त्याची दखलही मंडळाने घेतली आहे. याप्रकरणी महापालिकेला पुन्हा दंड होऊ शकतो.
दंड अधिकारी, ठेकेदाराला करावा
महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंड ठोठावला तर त्याचा भार नागरिकांवर पडतो. त्यामुळे मंडळाने हा दंड जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर करावा, अशी मागणी अभिजित भोसले यांनी केली आहे.