वाळव्यात १ लाख ३७ हजार, महापालिकेत १ लाख २६ हजार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:48+5:302021-07-09T04:17:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचे लसीकरण जास्त असणाऱ्या तालुक्यांना लसीचा जास्त पुरवठा होत आहे. महापालिकेला किंवा वाळवा तालुक्याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचे लसीकरण जास्त असणाऱ्या तालुक्यांना लसीचा जास्त पुरवठा होत आहे. महापालिकेला किंवा वाळवा तालुक्याला जास्त लस दिल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. लस वितरणात भेदभावाच्या तक्रारी काहीजण करत आहेत. त्यावर डुडी म्हणाले, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव, मिरज तालुक्यांत लसीकरणाला प्रतिसाद चांगला आहे. लस मिळताच दुपारपर्यंत संपते, त्यामुळेच तेथील लसपुरवठा जास्त दिसतो. त्यांची लोकसंख्याही जास्त आहे. बुधवारअखेर (दि. ७) सर्वाधिक १ लाख ३८ हजार ८१४ लसीकरण वाळवा तालुक्यात झाले आहे. महापालिका क्षेत्रात १ लाख २६ हजार ६८४ लसीकरण आहे. अन्य लसीकरण असे - आटपाडी ३६ हजार ९८०, जत ५२ हजार ६४, कडेगाव ४१ हजार ३४७, कवठेमहांकाळ ४१ हजार ४४५, खानापूर ३७ हजार ४८३, मिरज ९२ हजार ९०७, पलूस ३८ हजार ९७०, शिराळा ५४ हजार २५९, तासगाव ७१ हजार ५८५ लसीकरण झाले आहे. डुडी म्हणाले, जत तालुक्यात प्रतिसाद कमी आहे. संख, उमदी केंद्रांमध्ये नागरिक पुढे येत नाहीत. तेथे प्रतिसाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या आठवड्यात लसीकरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता, त्यामुळे एकाच दिवशी ५८ हजार डोस मिळाले होते. त्यादिवशी कोल्हापूरला ११ हजार ५००, साताऱ्याला ९ हजार ५०० आणि सोलापूरला ८ हजार ५०० डोस मिळाले होते. जिल्ह्याला जास्त डोस मिळावेत, यासाठी दररोज पाठपुरावा सुरु असतो.
डुडी म्हणाले, एकाचवेळी २८० ठिकाणी लसीकरण सुरु करण्याचा प्रयत्न आहे. लस उपलब्धतेनुसार सध्या ११० ठिकाणी लसीकरण सुरु आहे. उपकेंद्र नसेल तेथे शाळांमध्ये सोय करु. गर्दी टाळण्यासाठी कुपन पद्धत राबविण्याचे आदेश दिले आहेत.
चौकट
पहिला डोस ३२ टक्के लाभार्थ्यांना
डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३० लाख ७१ हजार ३७२ लाभार्थी आहेत, त्यापैकी ३२ टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक टक्केवारी (४२ टक्के) शिराळ्याची आहे.
चौकट
निवडणुकीमुळे वाळव्यात रुग्ण वाढले
वाळवा तालुक्यात निवडणुकीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावा डुडी यांनी केला. कडेगावमध्येही कोरोना अद्याप नियंत्रणात नसल्याचे ते म्हणाले.