चिनी कंपनीकडून एकाची १५ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:52 AM2019-07-24T11:52:59+5:302019-07-24T11:54:30+5:30
चीनमधील एका कंपनीने सांगलीतील एका उद्योजकाला १४ लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अशोक आदगोंडा पाटील (वय ५१, रा. चिंतामणीनगर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सांगली : चीनमधील एका कंपनीने सांगलीतील एका उद्योजकाला १४ लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अशोक आदगोंडा पाटील (वय ५१, रा. चिंतामणीनगर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पाटील यांचा फौंन्ड्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांना फेरोसिलिकॉन दगडाची गरज असते. हा दगड चीनमध्ये मिळतो. पाटील यांनी चीनमधील हायनान ओयुजीन ट्रेडिंग लिमिटेड हैना जि प्रोव्हिन्स या कंपनीशी संपर्क साधला व या कंपनीकडून त्यांनी २० आॅक्टोबर २०१८ रोजी फेरोसिलिकॉनचा दगड मागविला. त्यापोटी त्यांनी कंपनीला ११ लाख ४५ हजार रुपयेही वर्ग केले.
त्यानंतर तब्बल दोन महिन्यानी म्हणजे ११ डिसेंबर २०१८ रोजी चीनच्या या कंपनीने हा दगड भारतात पाठविला. तो मुंबईच्या बंदरात आला. पाटील यांनी तिथे साडेतीन लाखाची कस्टम ड्युटी भरून माल ताब्यात घेतला.
सांगलीत हा माल आल्यानंतर त्यांनी त्याची तपासणी केली असता, फेरोसिलिकॉन दगडाऐवजी साधे दगड पाठविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पुन्हा कंपनीशी संपर्क साधून, साधे दगड पाठविल्याबद्दल तक्रारही केली. तसेच भारतीय दूतावासाशीही संपर्क केला.