खाद्यतेलांच्या किमतीत पुन्हा १० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:13+5:302021-08-01T04:24:13+5:30
सांगली : जिल्ह्यासह देशातील खाद्यतेलांच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत ८ ते १० टक्के वाढ झाली असून, मागणी वाढत असताना ...
सांगली : जिल्ह्यासह देशातील खाद्यतेलांच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत ८ ते १० टक्के वाढ झाली असून, मागणी वाढत असताना तुलनेत उपलब्धताही ४५ टक्क्यांनी घटली आहे. मालाची कमी उपलब्धता, मागणीतील वाढ, इंधन दरवाढ व कोरोना काळातील अडचणींमुळे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
खाद्यतेलांच्या किमतीत मागील महिन्यात घट झाली होती. इंडोनेशियाने खाद्यतेल निर्यातीवरील करात १० टक्के कपात व भारताने आयात शुल्कात ५ टक्के कपात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात येतील, अशी चिन्हे होती. मात्र, अचानक देशात व आशिया खंडातून खाद्यतेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. तुलनेने पुरवठा कमी आहे.
कोरोना काळात वाहतूक विस्कळीत झाली आहे. यातच इंधन दरवाढीने वाहतूक खर्चही वाढला आहे. त्याचाही परिणाम दरवाढीवर दिसून येत आहे. सर्वप्रकारच्या खाद्यतेलांच्या किमतीत १० ते १२ रुपयांची वाढ गेल्या पंधरा दिवसांमध्ये झाली आहे. व्यापारी व उद्योजकांच्या मते अतिवृष्टी व महापुरामुळे तेलबियांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचाही परिणाम भविष्यात खाद्यतेलांच्या दरावर होऊ शकतो. खाद्यतेलांच्या वाढलेल्या दरामुळे पुन्हा नागरिकांची चिंता वाढली आहे. आर्थिक घडी कोरोनामुळे विस्कळीत झाली असताना खाद्यतेलांची थोडीसुद्धा दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे खाद्यतेलांच्या महागाईचे चटके असह्य होण्याची चिन्हे आहेत.
चौकट
खाद्यतेलांचे दर प्रतिलीटर
खाद्यतेल १५ जुलैपूर्वी सध्या
पाम ११४ १३०
सोयाबीन १५२ १६४
सूर्यफूल १५६ १६६
शेंगतेल १५६ १६६
सरकी १५० १६२
कोट
सध्या मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक ४५ ते ५० टक्क्यांनी कमी आहे. पंधरा दिवसांमध्ये ८ ते १० टक्के दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढ तसेच कोरोना काळात विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आदी कारणांमुळे दरवाढ झाली आहे.
- राहुल कापशीकर, तेल व्यापारी, सांगली
चौकट
वाहतूक खर्चात दुप्पट वाढ
सांगलीतील खाद्यतेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, सरकी तेलाची आवक करताना पूर्वी १० ते १२ हजार रुपये वाहतूक खर्च येत होता. हा खर्च आता इंधन दरवाढीमुळे २२ हजारांवर गेला आहे.