Sangli: वटवाघळांकडून एक एकर द्राक्षबागेचा फडशा, दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 06:32 PM2024-12-05T18:32:16+5:302024-12-05T18:32:33+5:30
कृषी व महसूलकडून पहाणी करून पंचनामा
तासगाव : हातनूर (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदार, माजी सरपंच विठ्ठल पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील द्राक्षबागेवर शेकडो वटवाघळांनी हल्ला करत बागेतील आठ ते दहा टन तयार द्राक्षमालाचे नुकसान केले.
विठ्ठल पाटील यांचे द्राक्षे पूर्ण तयार झाली होती. या बागेमध्ये सोमवारी रात्री शेकडो वटवाघळांनी हल्ला करत बागेतील सर्व तयार आठ ते दहा टन द्राक्ष मालाचे नुकसान केले. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषी अधिकारी बजरंग कोर्टे, तलाठी पतंग माने, सर्कल नीलेश भांबोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, ग्रामसेवक जालिंदर मोहिते, अजय पाटील, बंडू पाटील यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
द्राक्षबागेसाठी विठ्ठल पाटील यांनी साडेसहा लाख रुपये खर्च केले होते. चार वर्षांपूर्वी मांजर्डे रोडवरील महादेव शंकर पाटील यांच्या दोन एकर द्राक्षबागेचे अशा पद्धतीने वटवाघुळांनी नुकसान केले होते.
शेतमालकाला जागेवरच चक्कर
वटवाघळांनी बागेमध्ये एकही द्राक्ष घड शिल्लक ठेवला नाही. सकाळी विठ्ठल पाटील नेहमीप्रमाणे द्राक्षबागेत गेले असता त्यांनी हे विदारक चित्र पाहून त्यांना मोठा धक्का बसला व त्यांना चक्कर आली. या हल्ल्यात वटवाघळांनी बागेमध्ये एकही द्राक्ष घड शिल्लक ठेवला नाही.
नुकसानभरपाईची मागणी
विठ्ठल पाटील यांच्यावर आलेले हे अस्मानी संकट व त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी सांगितले.