पूर, अतिवृष्टीमुळे सांगलीत एसटीला १० लाखांचा फटका, ८२५ फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:17 PM2024-07-30T12:17:09+5:302024-07-30T12:18:24+5:30
सर्वाधिक नुकसान इस्लामपूर आगाराचे
सांगली : जिल्ह्यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पूरस्थिती, अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामुळे एसटीच्या जिल्ह्यातील दहा आगारांतील ८२५ फेऱ्या रद्द होऊन तब्बल दहा लाख २३ हजारांचे नुकसान झाले आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती, तसेच राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीने बसवाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्याच्या दहा आगारांतून विविध भागांत धावणाऱ्या ‘लालपरी’ची चाके थांबली आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्या अनेक मार्गांवरील एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. २८ जुलै रोजी जिल्ह्यातील ८२५ बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यातून १० लाख २३ हजार १३६ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
कोणत्या मार्गावरील वाहतूक बंद
- सांगली आगारातून जाणाऱ्या स्वारगेट, सातारा व विनावाहक कोल्हापूर बसेस बंद झाल्या आहेत.
- मिरज आगारातून कोल्हापूर, इचलकरंजी, माखजन व स्वारगेट फेऱ्या बंद झाल्या आहेत.
- इस्लामपूर आगारातून कोडोलीकडे जाणाऱ्या फेऱ्या ऐतवडेपर्यंत बंद झाल्या.
- तासगाव आगारातून पणजी व जोतिबापर्यंत फेऱ्या बंद
- जतमधून रत्नागिरी, सांगली व कोल्हापूर फेऱ्या बंद
- आटपाडीतून चिंचणीमार्गे मिरजपर्यंत वाहतूक बंद
- शिराळा आगारातून कोडोली, कांडवण, बांबवडेपर्यंत बंद
- पलूसमधून कोल्हापूर, इस्लामपूरपर्यंत वाहतूक बंद. काही मार्गांत बदल
आगारनिहाय रद्द फेऱ्या व आर्थिक नुकसान
आगार - रद्द फेऱ्या - बुडालेले उत्पन्न
सांगली - २२६ - १,७५, ११०
मिरज - १६४ - १,९३,६६६
विटा - ६४ - १,११,१,०९
इस्लामपूर - १२० - २,२८,३५९
तासगाव - १८ - २६,०२६
क.महांकाळ - ५५ - ९४,९१६
शिराळा - ९८ - ९७,५६७
पलूस - ७२ - ७२,४७८
४४६५१ किलोमीटरच्या फेऱ्या रद्द
जिल्ह्यातील सर्व दहा आगारांमधून ४४ हजार ६५१ किलोमीटरपर्यंतच्या ८२५ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यात सर्वाधिक इस्लामपूरमधून १० हजार ८२० किलोमीटरपर्यंतच्या फेऱ्या रद्द केल्या गेल्या.