मराठा आरक्षणासाठी उद्या विधानभवनावर धडक -सांगलीतून १० हजारांवर मराठा बांधव -संजय पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:30 PM2018-11-25T14:30:04+5:302018-11-25T14:31:41+5:30
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राज्यभर आंदोलने केल्यानंतर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तरीही त्यांच्या आश्वासनात स्पष्टता नसल्याने आरक्षणाविषयी साशंकता कायम आहे. यासह समाजाच्या इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित संवाद यात्रा सोमवार, दि. २६ नोव्हेंबरला
सांगली : मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राज्यभर आंदोलने केल्यानंतर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तरीही त्यांच्या आश्वासनात स्पष्टता नसल्याने आरक्षणाविषयी साशंकता कायम आहे. यासह समाजाच्या इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित संवाद यात्रा सोमवार, दि. २६ नोव्हेंबरला विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाभर आयोजित मराठा संवाद यात्रेचा आढावा व आरक्षणाविषयी भूमिका यावेळी पदाधिकाºयांनी मांडली. विधानभवनावर धडक देण्यासाठी जिल्ह्यातून दहा हजारावर समाजबांधव मुंबईला रवाना होणार असल्याचेही पदाधिकाºयांनी सांगितले.
डॉ. पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात जागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्टत १६ नोव्हेंबरपासून संवाद यात्रा आयोजित केली होती. जिल्ह्यातही यात्रेस चांगला प्रतिसाद मिळाला. आरक्षणाविषयी सध्या सरकारची भूमिका सकारात्मक दिसून येत असली तरी त्यात स्पष्टता नाही. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच कायद्याच्या चौकटीत बसणारे व अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मराठा समाजापुढे केवळ आरक्षण एवढीच समस्या नसून, इतरही प्रश्नामुळे समाजात अस्वस्थता आहे. यासाठी जिल्ह्यात आयोजित संवाद यात्रेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आरक्षणासह इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा वाहन मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्यातील समाजबांधव वाहनाने रवाना होणार आहेत. मागण्या मान्य होण्यासाठी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन चालू केले जाणार आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, उद्योजक कक्षाचे अध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, विलास देसाई, एस. आर. परब, अशोक पाटील, योगेश सूर्यवंशी, प्रदीप कदम, प्रा. लक्ष्मण शिंदे, सुभाष माने, महादेव पाटील, राहुल पाटील, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.
या मागण्यांसाठी आंदोलन
मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावीत, पोलिसांकडून होत असलेली दडपशाही थांबवावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालास हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, शैक्षणिक शुल्कामध्ये सरसकट सवलत मिळावी, दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.