मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे कारावास
By शीतल पाटील | Published: September 8, 2023 07:43 PM2023-09-08T19:43:49+5:302023-09-08T19:44:00+5:30
तासगाव येथील घटना : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
सांगली : मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून प्रशांत रामचंद्र रेंदाळकर (वय ३२, रा. मारुती मंदिरानजीक, वरचे गल्ली, तासगाव ) यास तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. एम. पाटील यांनी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
खटल्याची हकीकत अशी, फिर्यादी महिला चोरुन दारु विकत होती. तिची नात पिडीता मतीमंद आहे. आरोपी प्रशांत रेंदाळकर हा फिर्यादी महिलेकडे वारंवार दारु पिण्यास येत होता. त्यामुळे त्यांचा परिचय होता. फिर्यादी आणि पिडीता ओढ्यानजीक शेळ्या राखण्यास गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी महिलेने पिडीतेस काही अंतरावर असलेल्या शेळ्या घेवून येण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी प्रशांत रेंदाळकर तेथेच होता. पिडीता शेळ्या आणण्यास गेली असता आरोपी रेंदाळकर तिच्या पाठीमागे गेला आणि तिला शेळ्या एका झाडाला दोरीने बांधायला लावले. त्यानंतर तिच्या मानसिक असमर्थतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करुन पसार झाला. घडलेला प्रकार पिडीतेने घरी सांगितल्यावर तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार आणि दंडिले यांनी केला.
दरम्यान सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकारपक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीता, पिडीतेची आजी, आत्या तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब महत्वाचा ठरला. न्यायालयात आलेले साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन न्यायमूर्तींनी आरोपी प्रशांत रेंदाळकर यास दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पिडीत महिलेस राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. सरकारपक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.