सांगली जिल्ह्यातील १०० मुले शैक्षणिकदृष्ट्या दत्तक
By admin | Published: May 22, 2017 08:36 PM2017-05-22T20:36:37+5:302017-05-22T20:36:37+5:30
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणा-या जिल्ह्यातील शंभर मुलांना सांगलीतील ‘आकार’ फौंडेशनने शैक्षणिक दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे,
Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 22 - आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणा-या जिल्ह्यातील शंभर मुलांना सांगलीतील ‘आकार’ फौंडेशनने शैक्षणिक दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती फौंडेशनचे डॉ. प्रदीप पाटील, उज्ज्वला परांजपे व
ज्योती आदाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सहा ते १२ वयोगटातील मुले दत्तक घेतली जाणार असून, त्यांच्या बारावीपर्यंतची सर्व शिक्षणाची जबाबदारी फौंडेशन स्वीकारणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शैक्षणिक दत्तक उपक्रमात गरीब घरातील गरजू मुला-मुलींना गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तर, कंपास आदी वस्तू दिल्या जातील. बसचा पास, कपडे या गरजेच्या वस्तूही दिल्या जाणार आहेत. वैद्यकीय मदत, समुपदेशन, व्यवसाय निवड मार्गदर्शन या सेवाही मोफत पुरविल्या जातील. व्यक्तिमत्त्व विकासासाठी निवासी शिबिरे, शैक्षणिक सहली, लैंगिक शिक्षण हे उपक्रमही राबविले जाणार आहेत. गरजू, गरीब विद्यार्थ्यांची यादी देण्याचे आवाहन शाळांना केले होते. आतापर्यंत ३० मुलांची यादी आली आहे. आम्ही १०० मुलांना दत्तक घेण्याचे ‘टार्गेट’ ठरविले आहे. या सर्व मुलांच्या घरी जाऊन सर्व्हे करणार आहोत. खरोखरच ते गरीब आहेत, याची चौकशी करणार आहोत. सहा ते १२ वयोगटातील मुलांना दत्तक घेतले जाणार आहे. एकदा दत्तक घेतलेल्या मुला-मुलींच्या बारावीपर्यंतच शिक्षणाची जबाबदारी फाउंडेशन घेणार आहे.
दानशुरांनी मदत करावी-
उज्वला परांजपे म्हणाल्या, फौंडेशनच्या शैक्षणिक दत्तक उपक्रमात समाजातील दानशूरांनी सहभागी होऊन मदत करावी. दरवर्षी पाच हजार रुपयांची दिलेली मदत एखाद्या गरजू गरीब घरातील मुलाला उज्वल उन्नतीच्या मार्गावर नेऊ शकते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास हातभार लावू शकते. प्रत्येक सहा महिन्याला विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आलेख फोटोसह दानशूरांना पाठविला जाणार आहे.
फाउंडेशनकडून हे होणार...
* दानशूरांकडून येणाºया मदतीवर वर्षाच्या सुरुवातील मुलांना गणवेश,
पुस्तके, वह्या, दप्तर (सॅक), कंपास, पॅड, पेन्सील असे साहित्य दिले
जाईल.
* प्रत्येक महिन्याला अंगाचा व कपड्याचा साबण, टुथपेस्ट व वेळोवेळी
लागणारे शैक्षणिक साहित्य देणार.
* महिन्याचा बसचा पास, चप्पल, बूट व स्वेटर गरजेनुसार देणार.
* विशिष्ट वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार.
* दर महिन्याला विद्यार्थ्याचे व त्याच्या कुटुंबाचे समुपदेशन केले जाणार.
* अभ्यास व व्यक्तिमत्त्व विकासासाठी दर महिन्यास विविध उपक्रम.