सांगलीतील विद्युत कामांसाठी १०० कोटी देणार

By admin | Published: July 5, 2016 11:31 PM2016-07-05T23:31:35+5:302016-07-06T00:22:50+5:30

चंद्रशेखर बावनकुळे : सुधीर गाडगीळ, रवींद्र खेबूडकर यांच्यासोबत मुंबईत बैठक

100 crore for the works of Sangli | सांगलीतील विद्युत कामांसाठी १०० कोटी देणार

सांगलीतील विद्युत कामांसाठी १०० कोटी देणार

Next

सांगली : कृषी पंपांच्या प्रलंबित विद्युत जोडण्या, शहरातील प्रस्तावित उपकेंद्र (स्वीचिंग सबस्टेशन) याकरिता शंभर कोटी रुपये देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधीर गाडगीळ यांना दिले. या सर्व कामांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिली.
मुंबईत मंत्रालयातील ऊर्जा विभागाच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण उपस्थित होते.
यावेळी गाडगीळ म्हणाले की, इनाम धामणीत विद्युत उपकेंद्रासाठी ३० गुंठे जागा आवश्यक आहे. ती खरेदी करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्याठिकाणी खांब स्थलांतराच्या कामासाठीही निधीची आवश्यकता आहे. शहरातील उपकेंद्रासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कृषी पंपांच्या विद्युत जोडणीसाठी जिल्ह्यातून हजारो शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. निधी नसल्याने त्यांना जोडण्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून कंपनीविषयी नाराजी आहे. जिल्ह्यातील शेतीला प्राधान्याने या जोडण्या करून देणे गरजेचे आहे. या कामासाठी प्राथमिक अंदाजानुसार ८८ कोटी रुपयांची गरज आहे. हा प्रश्न गंभीर असल्याने हा निधी तातडीने मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे गाडगीळ यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले की, ८८ कोटींच्या पेड पेंडिंग कनेक्शनच्या खर्चाचा तसेच उपक्रेंद्र उभारणीचा प्रस्ताव तातडीने ऊर्जा विभागाकडे पाठवून द्यावा. शेतकरी व ग्राहकांच्या दृष्टीने या गोष्टी लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्ताव सादर झाल्यानंतर तातडीने हा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. तसेच सांगली जिल्ह्यातील ऊर्जा विभागाशी संबंधित अन्य प्रश्नही सोडविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)


‘लोकमत’चा प्रकाशझोत
कृषी पंपांच्या २५ हजार प्रलंबित जोडण्यांचे वास्तव व शेतकऱ्यांच्या अडचणींवर ‘लोकमत’ने प्रथम प्रकाशझोत टाकला होता. आ. सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता ऊर्जामंत्र्यांसमोर मांडला गेला आहे. तो सुटण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत.

Web Title: 100 crore for the works of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.