जिल्ह्यातील वीज जोडण्यांसाठी १०० कोटी

By admin | Published: November 2, 2015 11:00 PM2015-11-02T23:00:06+5:302015-11-02T23:59:18+5:30

चंद्रशेखर बावनकुळे : मुंबईतील बैठकीत निर्णय; दोनशे कोटींचा निधी लागण्याची शक्यता

100 crores for power connections in the district | जिल्ह्यातील वीज जोडण्यांसाठी १०० कोटी

जिल्ह्यातील वीज जोडण्यांसाठी १०० कोटी

Next

विटा : जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीवर असलेल्या कृषी व घरगुती वीज जोडण्या देण्यासाठी आवश्यक असलेल्या २०० कोटीपैकी पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये तातडीने देण्यात येतील, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मुंबईतील बैठकीत दिली. खानापूर विधानसभा मतदार संघात कृषी पंपांच्या तीन हजार, तर घरगुती दोन हजार पाचशे वीज जोडण्यांची प्रतीक्षा यादी महावितरणकडे आहे. मात्र, निधी नसल्याने वीज जोडण्या देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे खानापूर मतदार संघाचे आ. अनिल बाबर यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांना निवेदन देऊन, प्रतीक्षा यादीतील विद्युत ग्राहकांना तातडीने वीज जोडण्या देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात ऊर्जामंत्री बावनकुळे, आ. बाबर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महावितरणचे प्रकल्प संचालक पी. यु. शिंदे, मुख्य अभियंता एम. आर. केळे, सांंगलीचे अधीक्षक अभियंता एम. जी. शिंदे, ऊर्जामंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन ढोले उपस्थित होते.
आ. बाबर म्हणाले की, खानापूर मतदारसंघात ‘कृषी’च्या तीन हजार, तर घरगुती दोन हजार पाचशे वीज जोडण्यांची प्रतीक्षा यादी आहे. ती कमी करण्यात यावी. जळालेले ट्रान्स्फॉर्मर बदलण्याबरोबरच मतदारसंघात सहा ठिकाणी नवीन उपकेंद्रे निर्माण करावीत. मंत्री बावनकुळे यांनी, सांगली जिल्ह्यातील कृषी व घरगुती वीज जोडण्यांची प्रतीक्षा यादी किती आहे? असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सुमारे १३ हजार ग्राहकांची प्रतीक्षा यादी असून त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी, तातडीने पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. खानापूर व आटपाडी तालुक्यातील जळालेले ट्रान्स्फॉर्मर तात्काळ बदलून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही दिल्या. खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील सहा ठिकाणी नवीन उपकेंद्रे निर्माण करण्यासाठी त्याचा आराखड्यात समावेश करा, असा आदेश त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. (वार्ताहर)


आराखड्यात : नवीन उपकेंद्रांचा समावेश करा
यावेळी खानापूर मतदार संघातील कमळापूर, देवनगर, भिकवडी बुद्रुक, जांभुळणी, शेटफळे व निंबवडे येथे नवीन उपकेंदे्र निर्माण करण्यासाठी, त्यांचा आराखड्यात समावेश करावा, अशी सूचनाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली.


तेरा हजार वीज ग्राहक प्रतीक्षा यादी
जिल्ह्यातील कृषी व घरगुती वीज कनेक्शन्सची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाऱ्यांनी सुमारे १३ हजार ग्राहकांची प्रतीक्षा यादी असून त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.

Web Title: 100 crores for power connections in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.