शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 05:38 PM2019-12-05T17:38:21+5:302019-12-05T17:39:47+5:30
महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला.
सांगली : महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला. तसेच विकास कामाच्या उद्घाटनासाठी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना बोलावत नाहीत, यावरुन भाजप व काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास सदस्यांना बोलाविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, तम्मणगौडा रवी-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.
सभेत जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी, दुष्काळ, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शंभर टक्के कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशा मागणीचा ठराव मांडला. त्यास जितेंद्र पाटील यांनी पाठिंबा देत, तो सभागृहाने मंजूर करण्याची मागणी केली. यावर संग्रामसिंह देशमुख यांनी, ठराव मंजूर करुन शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले.
डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे यांनी, ग्रामपंचायतीला विविध योजनेतून निधी जिल्हा परिषदेतून दिला जातो. या विकास कामांच्या उद्घाटनाला ग्रामपंचायत सदस्यांना बोलावत नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त केली.
पाटील, शेंडगे यांनी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनाही जाब विचारला. यावर काँग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी, ग्रामपंचायतीनी विकास कामाच्या उद्घाटनाला कुणाला बोलवायचे, हा त्यांचा अधिकार आहे. सदस्यांना उद्घाटनास बोलविले नाही, म्हणून त्यांनी सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. यावरून काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये वाद रंगला. अखेर राष्ट्रवादीचे सदस्य संभाजी कचरे यांनी, जितेंद्र पाटील व प्रमोद शेंडगे यांना शांत करुन वादावर पडदा टाकला.
संग्रामसिंह देशमुख यांनी, ग्रामपंचायतीचा निर्णय काहीही असो, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी विकास कामाच्या उद्घाटनाला जि. प. सदस्य व पंचायत समिती सदस्यांना बोलाविले पाहिजे. पत्रिकेतही नाव घातले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.