पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण टक्का घसरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:16 PM2022-06-08T13:16:10+5:302022-06-08T13:16:55+5:30
पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती
संतोष भिसे
सांगली : पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेमुळे ग्रामीण तरुण भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जात आहेत. पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी होत आहे.
पोलिसात शहरी तरुण आणि अधिकाऱ्यांचाच भरणा झाल्यास सामाजिक समतोल ढासळण्याची भीती आहे. ग्रामीण मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही खाकी वर्दी पासून वंचित राहत आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात मैदानी चाचणी १०० गुणांची होती. लेखी ७५ गुणांची व मुलाखत २५ गुणांसाठी होती. मुलाखतीत संशयास्पद प्रकाराच्या शक्यतेने २०१० मध्ये ती पद्धत बंद करण्यात आली. लेखी व मैदानी चाचण्या प्रत्येकी १०० गुणांच्या केल्या.
नंतर फडणवीस सरकारने मैदानी ५० व लेखी चाचणी १०० गुणांची केली. त्यामुळे ग्रामीण तरुणांची मोठी पीछेहाट झाली. महाविकास आघाडी सरकारने पॅटर्न पुन्हा १००-१०० गुणांचा केला. २०२१ मधील परीक्षांमध्ये हाच पॅटर्न राहिला. आता तोदेखील बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.
परीक्षांचा बदलता पॅटर्न ग्रामीण तरुणांना त्रासदायी ठरत आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असतानाही लेखी परीक्षेत दांडी उडते. ग्रामीण भागात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नाही. शिकवणीही लावता येत नाही. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीवरच भर असतो, पण लेखी परीक्षेचा टप्पा पार करण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी आहे.
१०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण तरुण भरतीतून बाहेर पडतात, त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करायला हवा. १०० गुणांची मैदानी चाचणी प्रथम घ्यावी, त्यात उत्तीर्ण झालेल्यांचीच लेखी परीक्षा घ्यावी. यामुळे ग्रामीण तरुणांनाही क्षमता दाखविता येईल. - प्रा. रणजीत चव्हाण, पोलीस भरती मार्गदर्शक, सांगली.
२०१९ पूर्वीच्या पोलीस भरतीत १०० गुणांची मैदानी व नंतर ५० गुणांची लेखी परीक्षा व्हायची. त्यानंतर मात्र दोन्ही परीक्षा १०० गुणांच्या केल्या. मैदानी चाचणी नंतर घेतली जाते. ग्रामीण भागात मार्गदर्शन केंद्रांअभावी तरुण मागे पडतात. शहरी विद्यार्थी लेखी परीक्षेत बाजी मारतात. ग्रामीण उमेदवार मैदानी परीक्षेत सक्षम व पात्र असूनही लेखी परीक्षेच्या फेरीत बाहेर फेकले जातात. नवा पॅटर्न ग्रामीण तरुणांवर अन्यायकारक आहे. तो बंद करावा. - संगीता खटावकर, राज्य कार्यकारिणी सदस्या, पुरोगामी संघर्ष परिषद.