सांगली जिल्ह्यातील १0१ गावांत ‘एक गाव एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 10:53 PM2017-08-25T22:53:09+5:302017-08-25T22:54:47+5:30
सांगली : जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. यंदा केवळ जिल्ह्यातील १०१ गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. यंदा केवळ जिल्ह्यातील १०१ गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे.
जिल्हा प्रशासन व पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आलेच, त्यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र याचे बक्षीस घेतल्यानंतर बहुतांश गावे या उपक्रमातून बाहेर पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. दोन वर्षापूर्वी १४० गावांत हा उपक्रम राबविला. गतवर्षी हा आकडा ९६ होता. त्यामध्ये यंदा वाढ झाली आहे.
तंटामुक्त अभियानात जिल्ह्याने २००८-०९ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी २४५ गावांत ‘एक गणपती’ बसविला होता. २०१० मध्ये तब्बल ३०२ गावांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. पण त्यानंतर ही संख्या घटतच आहे. पोलिसांनी प्रबोधन करुनही आजची पिढी एकमेकांशी ईर्षा करण्यासाठी स्वतंत्रपणे मंडळाची स्थापना करुन गणेशाची प्रतिष्ठापना करीत आहे.