वीजबिलातून सुटका; सांगली जिल्ह्यातील १०२६ ग्राहकांनी घरावर बसवली सौरऊर्जा यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 03:36 PM2022-06-04T15:36:12+5:302022-06-04T16:00:30+5:30
परंपरागत साधनांवरील ताण कमी करण्यासाठी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून वीजनिर्मितीची यंत्रणा बसविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून जागृती होत आहे
सांगली : पारंपरिक ऊर्जा साधनांवरील भार कमी करण्यासाठी शासनातर्फे सौरऊर्जेचा वापर करण्याबाबत आवाहन व जागृती केली जात आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. जिल्ह्यातील १०२६ ग्राहकांनी सौरऊर्जा यंत्रणा बसवली आहे. त्यापासून प्रतिमहिना ११ लाख ७७ हजार युनिट वीजनिर्मिती होत आहे. सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीमुळे संबंधितांच्या वीज बिलाची रक्कमही कमी होऊ लागली आहे.
परंपरागत साधनांवरील ताण कमी करण्यासाठी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून वीजनिर्मितीची यंत्रणा बसविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून जागृती होत आहे. या यंत्रणेमुळे अनेक ग्राहकांची वीज बिले शून्यावर आली आहेत. नाममात्र बिल महिनाकाठी येत असल्यामुळे परंपरागत विजेची बचत होऊ लागली आहे. सध्या दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे.
वीज बिलासाठीचे विविध करही वाढत आहेत. त्यामुळे बिलाचा आकडाही वाढत आहे. यातून दिलासा मिळण्यासाठी सौरऊर्जेचा वापर आवश्यक बनत आहे. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी ग्राहकांना ४० टक्केपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
सौरऊर्जेसाठी करा ऑनलाईन अर्ज
महावितरणने रुफटॉप सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या महाडिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वीज ग्राहक ऑनलाईन अर्ज करू शकतात.
कोणाला करता येणार अर्ज?
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात. रूफटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी ३० पैसे प्रतियुनिटने विद्युत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवू शकतात.
किती मिळते अनुदान?
घरगुती ग्राहकांना छतावर एक ते तीन किलोवॅट सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा अधिक असेल तर २० टक्के अनुदान मिळते.
तीन वर्षांत पैसे वसूल
सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः तीन वर्षांत परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांना रुफटॉप सौरऊर्जा योजनेचा फायदा होत आहे. तसेच सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीमुळे संबंधितांच्या वीज बिलाची रक्कमही कमी होत आहे.
घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिट प्रमाणे महावितरणकडून विकत घेण्यात येत आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधितांना मिळत आहे. तसेच वीजबिलातून कायमची सुटका झाली आहे. - महेश पाटील, वीज ग्राहक.
सौरऊर्जा यंत्रणा बसविल्यामुळे वीज जाण्याची चिंता संपली आहे. दिवसेंदिवस वाढत्या वीज बिलाचाही प्रश्न सुटला आहे. पावसाळ्यात महिनाभर अडचणी आहेत, पण उर्वरित ११ महिने फायदाच आहे. - विष्णू शिंदे, वीज ग्राहक.
सौर यंत्रणा उभारणीमुळे दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौरऊर्जा योजनेत सहभागी होण्याची गरज आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (मेडा) संस्थेकडून राबविला जात आहे. - धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण.