Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी?

By अशोक डोंबाळे | Published: September 13, 2024 02:10 PM2024-09-13T14:10:33+5:302024-09-13T14:11:53+5:30

शासनाला अहवाल पाठवला 

11 crore crop loss due to heavy rains, floods in Sangli When will farmers get compensation? | Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी?

Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी?

सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या धुवाॅंधार पावसामुळे मिरज, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यांतील सहा हजार १६७.४७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे १० कोटी ९२ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडे नुकसानाचा अहवाल पाठवला असला, तरी शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने बुधवारी राज्य शासनाला अहवाल पाठवला आहे. अतिवृष्टी, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांमध्ये भाजीपाला, पपई, सोयाबीन, भुईमूग, भात, हळद, मका, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये चार तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांचे सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी १० कोटी ९२ लाख ९ हजार रुपयांची गरज आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या सहीने बुधवारी शासनाकडे पाठवला आहे.

सर्वाधिक फटका चार तालुक्यांमध्ये (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका -  शेतकरी - संख्या क्षेत्र - नुकसान रक्कम
मिरज - ४०३२ -  २५८८.९० - ४.४१ कोटी
वाळवा - ६१९३ - १६४९.०१ -  ३.६० कोटी
शिराळा - ५५०२ - १७१८ - ३.९० कोटी
पलूस - १२७२ - २०३.३४ ० - ०.३४ कोटी

कोणत्या पिकांचे नुकसान

मिरज : सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई, केळी.
वाळवा : सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई.
पलूस : सोयाबीन, भाजीपाला, ऊस, मका.
शिराळा : ऊस, भात.

अशी मिळणार भरपाई

बाधित पिकाखालील शेतीला हेक्टरी १७ हजार रुपये तर फळपिकांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

फळपिकांचे अत्यल्प नुकसान

शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यांतील ३६ शेतकऱ्यांच्या आठ हेक्टर २२ गुंठे फळपिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी दोन लाख ३३ हजार रुपये निधीची गरज आहे. या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.

Web Title: 11 crore crop loss due to heavy rains, floods in Sangli When will farmers get compensation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.