महापालिकेकडे ऑनलाईन ११ कोटीचा कर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:30+5:302021-09-08T04:32:30+5:30
सांगली : महापालिकेच्या विविध सेवा ऑनलाईन करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी करापोटी आतापर्यंत ...
सांगली : महापालिकेच्या विविध सेवा ऑनलाईन करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी करापोटी आतापर्यंत १० कोटी ८१ लाख रुपये नागरिकांनी ऑनलाईन जमा केले असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी दिली.
महापालिकेकडून जन्म-मृत्यू दाखले, नाट्यगृह बुकिंग, होर्डिंग्ज परवानगी, घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता बिल भरणा आदी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यातच या सेवांचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या महापालिकेचे विविध कर, परवाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
याबाबत कापडणीस म्हणाले की, महापालिकेच्या ॲानलाईन प्रणालीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील ४६,८०० नागरिकांनी ॲानलाईन घरपट्टी व पाणीपट्टी भरणा केला आहे. घरपट्टीपोटी ५ कोटी १५ लाख तर पाणीपट्टी पोटी ५ कोटी ६६ लाख असा एकूण १० कोटी ८१ लक्ष रूपयांचा महापालिकेकडे जमा झाले आहेत. तर जन्माचे १६,७६५ व मृत्यूचे ३०,३५५ असे एकूण ४७,१२० दाखले नागरिकांनी ऑनलाईन प्राप्त करून घेतले आहेत. आपत्ती मित्र ॲपही ७ हजार ५०० लोकांनी डाऊनलोड केले असून पूर काळात या ॲपचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.
या ॲानलाईन प्रणालींमुळे नागरिकांच्या वेळेची बचत झाली आहे. तसेच मनुष्यबळ, स्टेशनरी व प्रिटींगच्या खर्चही वाचला आहे. नव्याने विकसित केलेल्या थकबाकी दाखले, होर्डींग परवाना, नाट्यगृह बुकिंग, विवाह नोंदणी या प्रणालींनाही नागरिक चांगला प्रतिसाद देतील, असे त्यांनी सांगितले.