सांगलीत ११ लाखांचा गुटखा, तंबाखू जप्त : किराणा दुकानाच्या नावाखाली गोदाम; कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:00 AM2018-10-31T00:00:41+5:302018-10-31T00:03:18+5:30
येथील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.
सांगली : येथील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
राज्य शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही चोरुन उत्पादन करुन त्याची विक्री सुरुच आहे. नानवाणी किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली. त्यावरून पिंगळे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सायंकाळी पाच वाजता तेथे छापा टाकला. यावेळी किराणा माल विक्रीच्या नावाखाली दुकानात गुटखा आणि तंबाखूचा साठा ठेवण्यासाठी गोदाम करण्यात आल्याचे दिसून आले.
येथून सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने गोदामाची झडती घेतल्यानंतर सुगंधित तंबाखू तसेच विविध कंपन्यांचा गुटखा सापडला. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याची मोजदाद सुरु होती. एकूण दहा लाख ६६ हजार दोनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
नानवाणी याच्या किराणा दुकानाचा परवाना लाजम सिकंदर मुजावर यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परवाना अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरु ठेवली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासन विभागच तपास करणार आहे. गुटखा व तंबाखूचा साठा कोठून आणला, तो कुठे विकला जाणार होता, याची सखोल चौकशी केली जाईल, असे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार राजू कदम, विजयकुमार पुजारी, जगू पवार, विद्यासागर पाटील, अमित परीट, युवराज पाटील, नीलेश कदम, संतोष कुडचे, सुनील लोखंडे, महादेव धुमाळ, शशिकांत जाधव, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, अनिल पवार, रोहन शहा, स्मिता हिरेमठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दोन वर्षानंतर पुन्हा छापा
दोन वर्षापूर्वीही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला होता. सोमवारी पुन्हा याच दुकानावर छापा टाकून साठा जप्त केला. यावरुन हे दुकान गुटखा आणि तंबाखू विक्रीचे केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ कारवाई केली जात आहे; पण ही विक्री थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
सांगलीच्या मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.